Skip to content Skip to footer

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकातून महाराष्ट्र सावरला आहे का? R-Value आली खाली, जिल्ह्यांच्या परिस्थितीत सुधार

महाराष्ट्र बुलेटिन : आरोग्य मंत्रालयाने कोविड -१९ महामारीशी संबंधित भारताचा राज्यवार डेटा सादर केला, ज्यामध्ये ग्राफिक्स आणि चार्टद्वारे राज्यांनी कोविडचा सामना कसा केला याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यात एक चांगली गोष्ट समोर आली की महाराष्ट्राची आकडेवारी लाल निशाणीपासून बाहेर गेली आहे. तथापि, धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. राज्याने गेल्या वर्षी साथीच्या आजाराशी दोन हात करण्यास सुरुवात केली होती आणि विषाणूविरूद्धची ही लढाई दुसऱ्यांदा जिंकली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र राज्याचे नाव अगदी सुरुवातीपासून प्रत्येक चार्टमध्ये अव्वल आहे. सरकारच्या मते, आता महाराष्ट्र पुन्हा पटरीवर परतत आहे.

राज्याच्या आर-व्हॅल्यू (R-value) ची गती दर्शवते की देशात जो कोविड-१९ चा संसर्ग पसरत आहे, तो मंद होत १ पर्यंत झाला आहे आणि तो सातत्याने कमी देखील होत आहे. भारतातील ४४ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर अजूनही १० टक्क्यांहून अधिक आहे. विशेष गोष्ट म्हणजे यामध्ये एकही जिल्हा महाराष्ट्रातील नाही. राज्यात चिंतेची बाब हीच आहे की अहमदनगर, सोलापूर आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये कोविड -१९ संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे. हे आकडे पूर्वीचे जिल्हे ज्यांना हॉटस्पॉट ठरवण्यात आले होते त्यांच्या तुलनेने अधिक आहेत.

दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सर्वोच्च पातळीवर जाण्यापूर्वी जेव्हा राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले होते, तेव्हा मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, रायगड आणि सातारा सहित दहा जिल्हे देशभरात सर्वात वाईट स्थितीत होते. महाराष्ट्र आता हळूहळू अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहे. मॉल आणि दुकाने उशिरापर्यंत उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर योग केंद्र, स्पा, सलून आणि जिम देखील ५० टक्के क्षमतेने विना वातानुकूलित सुविधेसह उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तथापि, मॉल उघडण्याची परवानगी असली तरी मल्टिप्लेक्स आणि थिएटर पुढील आदेशापर्यंत बंद ठेवावे लागतील.

Leave a comment

0.0/5