Skip to content Skip to footer

अण्णा हजारे लोकपालसाठी पुन्हा मैदानात, आंदोलनाची घोषणा करणार

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज राजघाटावरुन मोदी सरकारविरोधात आंदोलनाची घोषणा करतील, अशी शक्यता आहे. लोकपाल आणि स्वामीनाथन आयोगाकडे दुर्लक्ष केल्याने अण्णा हजारे आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.

अण्णा गेल्या तीन वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातत्याने पत्र पाठवून लोकपालची अंमलबजावणी आणि शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी मागणी करत आहेत. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून फक्त कार्यवाही सुरू असल्याचे त्रोटक उत्तर देण्यात येतं. त्यामुळे जर अण्णांनी आंदोलनाची घोषणा केली, तर त्यावर मोदी सरकार त्याला कसं प्रतिसाद देतं, हे पाहणं महत्वाचं आहे.

अण्णा हजारेंचं मोदींना पत्र

अण्णा हजारेंनी यापूर्वी मोदी सरकारला पत्र लिहून आंदोलन छेडण्याचा इशारा दला होता.

”भ्रष्टाचारमुक्त भारताचं स्वप्न पाहत 2011 साली दिल्लीच्या रामलिला मैदानावर देशव्यापी आणि ऐतिहासिक आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची दखल घेत 27 ऑगस्ट 2011 रोजी संसदेत ‘सेन्स ऑफ हाऊस’ नावाने ठराव पास करण्यात आला. ज्यामध्ये केंद्रात लोकपाल, राज्यात लोकायुक् आणि सिटिझन चार्टर यांची नियुक्ती करण्याबाबतच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर कायदा बनवण्यासाठी निर्णय घेण्यात आला. मात्र आज सहा वर्षांनंतरही देशात भ्रष्टाचार रोखणाऱ्या एकाही कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.” असं अण्णा हजारेंनी पत्रात म्हटलं होतं.

”सत्तेत येऊन तीन वर्ष झाली, तरीही उत्तर नाही”

”सत्तेत येऊन तीन वर्ष झाली तरीही लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीबाबत तुम्ही अजून काहीही उत्तर दिलेलं नाही. संसदेत विरोधी पक्षात असताना तुम्हीही या कायद्याला संपूर्ण पाठिंबा दिला होता. 2014 साली तुमचा पक्ष सत्तेत आला. लोकपाल आंदोलनानंतर देशभरातील जनतेने मोठ्या अपेक्षेने तुमच्या नेतृत्वात तुमच्या पक्षाच्या हातात सत्ता दिली. मी गेल्या तीन वर्षात तुम्हाला अनेकदा पत्र लिहिली. मात्र तुम्ही अजून त्याला एकदाही उत्तर दिलं नाही आणि काही अंमलबजावणीही केली नाही. शिवाय कधी ‘मन की बात’मध्येही त्याचा उल्लेख केला नाही, किंवा जनतेशी संवाद साधतानाही लोकपालचा विषय काढला नाही. मग भारत भ्रष्टाचारमुक्त कसा होईल?” असं अण्णा हजारेंनी पत्रात लिहिलं होतं.

”तुमच्या करण्यात आणि बोलण्यात अंतर”

”विरोधीपक्षाचं सरकार आहे त्या राज्यात ठिक आहे. मात्र तुमचं सरकार असलेल्या राज्यातही तुमच्या पक्षाने लोकायुक्ताची नेमणूक केलेली नाही. यावरुन तुमची कायद्याची अंमलबजावणी करण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट होते. तुमच्या बोलण्यात आणि करण्यात फरक आहे. त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त भारत कसा होईल?” असा सवाल अण्णा हजारेंनी केला.

”देशाच्या भल्यासाठी पुन्हा आंदोलन”

”यापूर्वी 28 मार्च 2017 रोजी तुम्हाला पत्र लिहिलं होतं आणि सांगितलं होतं की, लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी नाही झाली तर माझं पुढचं पत्र दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाविषयी असेल. त्यानुसार देशाच्या भल्यासाठी मी पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.” असं अण्णा हजारेंनी पत्रात म्हटलं.

अधिक माहिती

Leave a comment

0.0/5