Skip to content Skip to footer

निवृत्ती नंतरचे दिवस कुटुंबासमवेत सुखात जावेत एवढीच तर इच्छा असते; पण सगळ्यांनाच हे सुख लाभते, असे नाही. त्यांचे नेमके काय चुकते? – विजय लाटे

आयुष्यभर कष्ट करून मुलांना वाढविले. निवृत्ती नंतरचे दिवस कुटुंबासमवेत सुखात जावेत एवढीच तर इच्छा असते; पण सगळ्यांनाच हे सुख लाभते, असे नाही. त्यांचे नेमके काय चुकते?

एका राष्ट्रीयीकृत बॅंकेमध्ये मी वरिष्ठ व्यवस्थापक होतो. पुण्यातील शिवाजीनगर शाखेत अधिकारी होतो. त्या वेळी बचत खाते विभाग आणि निवृत्ती वेतनधारकांचे खाते माझ्याकडे होते. शाखेत अनेक केंद्रीय, संरक्षण, राज्य सरकारी निवृत्ती वेतनधारकांची खाती होती. महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत या निवृत्तिवेतनधारकांची गर्दी असे. या गर्दीत अनेक निवृत्त कर्मचारी पाहत असे. कुणी अपंग, अंध, खूप वयस्कर, निरक्षर, असे निवृत्त पाहण्यात येत असत. मी माझ्या वतीने त्यांना पैसे मिळण्यासाठी जमेल तेवढी मदत, मार्गदर्शन करीत असे. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्‍न असत. पण, त्यांना काही अडचण येऊ नये यासाठी माझ्या अखत्यारीत मी प्रश्‍न सोडवत असे. या सर्व गर्दीत एक निवृत्त चेहरा नकळतच मनावर बिंबून राहिला.

प्रत्येक महिन्याला हा निवृत्त त्यांच्या सुनेसोबत अथवा मुलगी असेल तिच्याबरोबर येत असे. अत्यंत स्वच्छ परीटघडीचे कपडे, गुळगुळीत दाढी करून ही व्यक्ती प्रत्येक महिन्याला पैसे काढण्यासाठी येत असे. त्यांना निवृत्तिवेतनही त्या काळाच्या मानाने चांगले मिळे. परंतु त्यांच्या डोळ्यांत एक विचित्र उदासी, दुःख दिसत असे आणि त्याचा उलगडा होत नसे. त्यामुळे मन अस्वस्थ होत असे. त्यांच्याशी बोलण्याचा काही प्रयत्न केला, तर ते केवळ उदास हसत. दोन वर्षे मी त्यांना पाहत होतो. ते त्यांच्या सुनेबरोबर नियमित येत असत; परंतु दिवसेंदिवस ते अशक्त आणि जादा चिंतातूर दिसत असत. त्यांच्या डोळ्यांत दाटलेल्या उदासीमुळे ते चांगलेच लक्षात राहिले.

नंतर माझी बदली अन्य शाखेत झाली. तेथे कामास सुरुवात केल्यानंतर साधारण एक वर्षाने काही कामानिमित्त जुन्या शाखेत गेलो. काम संपल्यावर येताना श्री जंगली महाराज मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे म्हणून मंदिराकडे वळलो. महाराजांचे दर्शन घेऊन देवळाबाहेर आल्यावर, दाराबाहेर काही भिकारी बसले होते. सवयीने मी खिशात हात घालून त्यांना देण्यासाठी चिल्लर काढली. त्यांना सुटी नाणी देत पुढे येत असता, एक भिकारी तोंड लपविण्याचा प्रयत्न करीत आहे, असे लक्षात आले. त्याच्या भांड्यात सुटी नाणी टाकताना त्यांच्याकडे पाहिले, तर तो चेहरा खूप ओळखीचा वाटला, पण कुणाचा तो आठवेना. त्या पाच-दहा सेकंदांत बुद्धीला खूप ताण दिला आणि लखकन प्रकाश पडला. शिवाजीनगर शाखेत दरमहा सुनेबरोबर येणारे तेच होते. मला त्यांचे नाव आठवले होते म्हणून त्यांना नावाने हाक मारली.

तेव्हा त्यांनी दचकून माझ्याकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मला मोठा धक्का बसला आणि त्यांच्याजवळ जाऊन ‘बाबा काय झाले’ म्हणून विचारू लागलो. थोड्या वेळाने दुःखाचा आवेग ओसरल्यावर, त्यांनी जे सांगितले ते ऐकून पायाखालची जमीन सरकते आहे, असे वाटले.

त्यांनी जे सांगितले ते असे, की त्यांच्या पत्नीचे पाच-सहा वर्षांपूर्वी निधन झाले होते. ते सरकारी नोकरी करून रीतसर निवृत्त झाले. निवृत्ती नंतर सुनेच्या आणि मुलाच्या आग्रहाखातर स्वतःची शिल्लक रक्कम, फ्लॅट, दागदागिने, ठेवी त्या दोघांच्या नावावर केल्या. हे केल्यानंतर एक वर्ष मुलगा व सून दोघे खूप चांगले वागले. परंतु त्यानंतर मात्र दर महिन्याला त्यांनी आबाळ करावयास सुरुवात केली. उपाशी ठेवणे, औषधपाणी न करणे, खर्चास पैसे न देणे इत्यादी प्रकार सुरू केले.

त्यानंतर दर महिन्याला निवृत्ती वेतनाचे पैसे काढण्यासाठी त्यांची दाढी करून, नीटनेटके कपडे घालून बॅंकेत पैसे काढण्यासाठी आणले जाई. नियमाप्रमाणे ठेवली जाणारी रक्कम ठेवून खात्यावरील बाकीच सर्व पैसे काढून घेतले जात.ते सर्व पैसे सून व मुलगा काढून घ्यायचे आणि पुढे महिनाभर हेळसांड सुरूच.

घरात झोपण्यापुरता निवारा होता. हा सर्व त्रास का सहन करीत होता, असे विचारले असता, ‘नातवावर खूप प्रेम असल्यामुळे हे सर्व सहन करीत आहे. आता तर जेवण, चहापाणीसुद्धा देत नाहीत. मी फक्त रात्री झोपण्यापुरता आणि स्नानासाठी घरी जातो. स्वतःचे कपडे धुतो. कामे स्वतः करतो. स्वतःला दोन वेळच्या जेवणासाठी, काही पैसे खर्चासाठी आणि औषधपाण्यासाठी लागतात म्हणून हा भीक मागण्याचा मार्ग दोन महिन्यांपासून स्वीकारला. सकाळपासून रात्रीपर्यंत येथे असतो. पोटाला खावून रात्री उशिरा घरी जातो आणि पुन्हा सकाळी सर्व उरकून येथे येतो. त्यामुळे सुनेच्या जाचातून सुटका होते. परंतु नातवाच्या प्रेमामुळे रात्री आपोआप पाय घराकडे वळतात.’

हे सर्व ऐकल्यावर मुला-मुलींसाठी कष्ट उपसणाऱ्या आई-वडिलांची कीव करावी का संस्कार कमी पडले म्हणून मनाची समजूत करून घ्यावयाची, याचा विचार करीत सुन्न मनाने तेथून निघालो. आता या गोष्टीला दहा वर्षे उलटून गेलीत. ते गृहस्थ आता त्या भिकाऱ्यांच्या रांगेत दिसत नाहीत.

विजय लाटे

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5