हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गर्दी हे भल्या भल्या लोकांना न उमजलेले गणित आहे. गेली चार दशके मराठी मनामध्ये त्यांनी गाजवलेली सत्ता याचे प्रतिबिंब बाळासाहेबांच्या अंत यात्रेवेळी त्यांना नमन करण्यासाठी लोटलेला जनसागर बघूनच कळते. स्वातंत्र्यानंतर इतकी मोठी अंतयात्रा कदाचितच कोणाची निघाली असेल. बाळासाहेबांनी फक्त शिवसैनिकांवरच नाही तर त्यांच्या कुटुंबावरसुद्धा तितकेच प्रेम केले आणि अगणित लोकांना मदत केली. हिंदू धर्मावरची त्यांची अगाध श्रद्धा आणि प्रेम, हिंदुधर्मरक्षणाचे कार्य, यामुळेच त्यांना हिंदुहृदयसम्राट ही जनसामान्यांनी पदवी दिली.
राम मंदिर
आज राम मंदिरावरून सत्ताधारी पक्षाचे सुरु असलेले राजकारण बघून तो नव्वदीच्या काळ आठवणीत येतो. अनेक दिग्गज राष्ट्रीय नेत्यांनी त्यावेळी यात्रा सुरु केल्या होत्या. संपूर्ण भारतवर्षात एकाच नारा होता, “राम मंदिर”. संपूर्ण देशातून अनेक तडफदार तरुण हिंदुत्वाचा अंगार घेऊन अयोध्येत पोहोचले होते. सर्वांचा मनसुबा एकाच, बाबरी मस्जिदीचा जमीनदोस्त करणे. बाबरी मस्जिद पाडली गेली आणि देशात दंगली उसळल्या. भयंकर अशी ही दंगलीची परिस्थिती बघून पुढे पुढे नाचणारे अनेक राष्ट्रीय नेते हात झटकू लागले. ही जबाबदारी कोणी घ्यायलाच तयार होत नव्हते. या मध्ये आम्ही नव्हतोच आणि जर असतील तर ते “शिवसैनिक” असतील असा आरोप केला गेला.
सर्व मीडिया, पत्रकार, नेते, विरोधक बाळासाहेबांना एकाच प्रश्न विचारात होते, “हे तुमचे शिवसैनिक होते काय?” सामान्य माणसात स्वाभिमान जागा करणारा हा भारत मातेचा सुपुत्र शिवसैनिकांना एकटे टाकून देणारा नेता नव्हताच. हे महाराष्ट्राचे सुपुत्र, जनसामान्यांमध्ये हत्तीचे बळ भरणारे हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले, “हे बाबरी पाडणारे जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे”.
हिंदुत्वाचा हा भार भल्या भल्यांना पेलवला नाही, काहींनी सोईप्रमाणे वागवला, काहींनी झटकून दिला पण आपल्या मातीशी व तत्वांशी एकनिष्ठ राहणार एकच होऊन गेला. हिंदुत्वाचा भार एकालाच पेलवला..बाळासाहेब ठाकरे.
“गर्व से काहो हम हिंदू है” या उद्गारानेच त्यांनी समस्त हिंदुस्तानमधील हिंदूंमध्येही स्वाभिमान जागा केला. या सहाव्या पुण्यदिनी आज त्यांना नमन. “राम मंदिर” हा हिंदुस्थानातल्या हिंदू जनभावनेचा विषय असलेल्या मुद्द्यावर शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी घेतलेला हा पवित्रा राजकारणासाठी नव्हे तर समाजकारणासाठीच आहे यावर प्रत्येक माणूस शिक्कामोर्तब करेल.
मराठी अस्मितेची आग ज्याने महाराष्ट्रातल्या मराठी माणसात धगधगत ठेवली अश्या व्यक्तिमत्वास प्रणाम, त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र घडवायचा प्रयत्न करुया.
जय महाराष्ट्र.