शेतक-यांना एकाचवेळी आणि एकाचजागी आधुनिक तंत्रज्ञान व कृषि क्षेत्रातील माहिती मिळावी या उद्देशाने भारतातील सर्वात मोठे ‘किसान’ कृषि प्रदर्शन 12 ते 16 डिसेंबर 2018 दरम्यान मोशी येथे भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात देश, विदेशातील सहाशेपेक्षा अधिक कंपन्या, संशोधन संस्था सहभागी होणार आहेत. तसेच विद्यापीठ, कृषी महाविद्यालये, संशोधन संस्था, शेतक-यांसाठी काम करणा-या सामाजिक संस्था देखील सहभाही होणार आहेत. याबाबतची माहिती ‘किसान’ कृषि प्रदर्शनचे संयोजक निरंजन देशपांडे यांनी आज (गुरुवारी)पत्रकार परिषदेत दिली.
पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र मोशी येथे हे प्रदर्शन 12 ते 16 डिसेंबर 2018 दरम्यान होणार आहे. बुधवारी (दि.12)सकाळी नऊ वाजता शेतक-यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञान व कृषि क्षेत्रातील नवे विचार शेतक-यांपर्यंत पोहोचविणे हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषि निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, नर्सरी, शेती लघुउद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉल शेतक-यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. पाण्याचे नियोजन आणि सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणा-या 100 पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण आहे.
देशपांडे म्हणाले, ‘मोबाईलचा वाढता वापर आणि डिजीटल इंडिया उपक्रमांमुळे शेतक-यांशी संवाद साधणे सहज शक्य झाले आहे. यामुळेच उद्योजक नवनवीन सेवा व उत्पादने शेतक-यांसमोर मांडण्यास उत्सुक आहेत. हे उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जल व्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान, त्यामुळे निर्माण होणा-या संधीची माहिती घेऊ शकणार आहेत. पाच दिवसीय प्रदर्शनामध्ये देशभरातून सुमारे दोन लाखापेक्षा अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे’.
‘आंतरराष्ट्रीय दालनात चीन, तैवान व युरोपमधील कंपन्यांचा सहभाग आहे. दालनात 50 कंपन्या असणार आहेत. भारतीय शेतक-यांच्या गरजा व बाजारपेठ जाणून घेणे, भारतात विक्री प्रतिनिधी नेमणे हा या कंपन्यांचा उद्देश आहे. हे दालन प्रदर्शनाच्या पहिले तीन दिवस म्हणजेच 12 ते 14 डिसेंबर दरम्यान खुले असणार असल्याचे’, देशपांडे यांनी सांगितले.
प्रदर्शन प्रवेशासाठी नावनोंदणी शुल्क 100 रुपये ठेवण्यात आले आहे. पूर्वनोंदणीची सुविधा kisan.net या संकेतस्थळावर आणि kisan.net या मोबाईल अँपवर उपलब्ध आहे. पूर्वनोंदणी केल्यास प्रवेश शुल्कात 50 रुपये सवलत देण्यात आली आहे. प्रदर्शन स्थळी जाण्यासाठी पुण्याच्या शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमंगल बस स्टॉप पासून बसची मोफत सोय करण्यात आली आहे. किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी 020- 30252020 किंवा www.kisan.in या संकेतस्थळावर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.