पंचकुलाच्या स्पेशल CBI कोर्टाने पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राम रहीम यांना 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.
राम रहीम यांच्यासह कुलदीप सिंह, निर्मल सिंह आणि कृष्ण लाल या तिघांनाही कोर्टानं जन्मठेपेचीच शिक्षा सुनावली आहे.
24 ऑक्टोबर 2002 रोजी रामचंद्र छत्रपती यांची हत्या झाली होती. न्यायालयानं 11 जानेवारी 2019 ला राम रहीम यांना दोषी ठरवलं होतं.
या खटल्याच्या सुनावणीमध्ये राम रहीम यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी करण्यात आलं होतं. राम रहीम यांना शिक्षाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावण्यात आली.
2002मध्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी पहिल्यांदा डेरा सच्चा सौदामध्ये महिला साध्वीवर झालेल्या अत्याचाराविषयी बातमी छापली होती. ऑगस्ट 2017 मध्ये स्पेशल CBI कोर्टानं राम रहीम यांना बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवलं होतं.
ऑगस्ट 2017मध्ये न्यायाधीश जगदीप सिंह यांनी याच बलात्काराच्या खटल्यात राम रहीम यांना दोषी ठरवलं होतं. छत्रपतींच्या हत्येप्रकरणी राम रहीम यांना दोषी ठरविणारा निकालही जगदीप सिंह यांनीच दिला.
रामचंद्र छत्रपती हरियाणातल्या सिरसा इथं ‘पूरा सच’ नावाचं सायंकालीन दैनिक चालवायचे.आश्रमातल्या साध्वीसोबत झालेल्या बलात्काराच्या बातमीनंतर ऑक्टोबर 2002मध्ये त्यांची राहत्या घरी गोळ्या घालून हत्या केली होती.
2003मध्ये यासंदर्भातील केस दाखल करण्यात आली होती. तर 2006मध्ये हे प्रकरण CBI कडे सोपवण्यात आलं.
ऑगस्ट 2017मध्ये राम रहीम यांना बलात्कार प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी हरियाणातल्या सिरसा आणि पंचकुलामध्ये हिंसा घडवली होती. त्यामध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या खटल्याच्या सुनावणी दरम्यान हरियाणा आणि पंजाबमध्ये कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती.
51 वर्षीय राम रहीम सध्या बलात्काराच्या आरोपाखाली रोहतकमधल्या तुरुंगात 20 वर्षांचा तुरुंगवास भोगत आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
“2000मध्ये सिरसा येथे रामचंद्र छत्रपती यांनी वकिलीचं काम सोडून ‘पूरा सच’ हे सायंदैनिक सुरू केलं,” असं सिरसा इथले स्थानिक पत्रकार प्रभु दयाल यांनी बीबीसीला सांगितलं.
“2002 च्या दरम्यान त्यांना निनावी पत्र मिळालं. या पत्रात डेरामध्ये साध्वींचं लैंगिक शोषण होत असल्याचं लिहिलं होतं. त्यांनी ते पत्र छापलं. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या,” असं प्रभु दयाल सांगतात.
अखेर 19 ऑक्टोबरच्या रात्री छत्रपती यांच्यावर राहत्या घरी गोळ्या घालण्यात आल्या. 21 ऑक्टोबरला दिल्लीतल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
प्रभू दयाल सांगतात की, हॉस्पिटलमध्ये छत्रपती शुद्धीवर आले होते. पण राजकीय दबावाखाली त्यांचा जबाब नोंदवून घेतला गेला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव अंशुल छत्रपती यांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूची चौकशी CBIद्वारे व्हावी अशी याचिका केली.
पत्रकार रामचंद्र छत्रपती हे डेरा सच्चा सौदाबाबत बातम्या छापायचे. त्यामुळं त्यांना सतत धमक्या यायच्या असं अंशुल छत्रपतींनी सांगितलं.
घटनाक्रम
19 ऑक्टोबर 2002च्या रात्री छत्रपती यांना त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालण्यात आल्या.
21 ऑक्टोबरला दिल्लीतल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
डिसेंबर 2002मध्ये छत्रपती यांच्या कुटुंबानं स्थानिक पोलिसांच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त करत मुखमंत्र्यांकडं CBI चौकशीची मागणी केली.
जानेवारी 2003मध्ये अंशुल छत्रपती यांनी हायकार्टात याचिका दाखल करत CBI चौकशीची मागणी केली.
नोव्हेंबर 2003 हाय कार्टानं पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि डेरा प्रेमी रणजीत सिहं यांच्या हत्येबाबत CBIला FIR दाखल करण्याचे आदेश दिले.
डिसेंबर 2003मध्ये CBIनं चौकशीला सुरुवात केली .
त्याचवेळी डेरानं सु्प्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यामध्ये CBI चौकशी थांबवण्याची मागणी केली होती. त्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं चौकशी थांबवली होती.
नोव्हेंबर 2004मध्ये दुसऱ्या पक्षाची बाजू ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टानं CBI चोकशी पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले.
25 ऑक्टोबर 2017ला डेरामधल्या साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीमला 20 वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली.
11 जानेवारी 2019 ला पत्रकर रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी राम रहीम सहित आणखी तिघांना दोषी ठरवलं.