शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा दिखावा करणाऱ्या भाजपाचा खोटेपणा पुन्हा दिसून आला आहे. भाजपा किसान मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी शेतीच्या वादातून एका शेतकऱ्यास व त्याच्या कुटुंबातील तीन महिलांना भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी मारहाण केली. त्यानंतर खड्ड्यातही जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या कुटुंबाने केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथे आज सकाळी घडली आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासून जालन्यात भाजपा कार्यकारणीची बैठक सुरु आहे व या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि कृषिमंत्री चंद्रकांतदादा पाटील स्वतः उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, निवडुंगा येथील शेतकरी ज्ञानेश्वर खांडेभराड व कृष्णा खांडेभराड यांच्या गट क्र. ४१७ मधील शेताचा कोर्टात वाद चालू आहे. आज सकाळी ज्ञानेश्वर खांडेभराड यांच्या शेतात भाजप किसान सेलचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर व अन्य १० ते २० जणांनी येत पोकलेनच्या मदतीने विहीर खोदण्याचा प्रयत्न केला. यावेळी खांडेभराड यांनी, या जमीनीचा वाद चालू आहे. त्यावर अद्याप निकाल लागलेला नाही. असे सांगून काम थांबविण्याचा प्रयत्न केला. यावर संतप्त भवर व त्यांच्या साथीदाराने गंगा बळीराम खांडेभराड, रेणुका कृष्णा खांडेभराड, प्रयाग विष्णू खांडेभराड व विठ्ठल नामदेव खांडेभराड यांना जबर मारहाण करून जखमी केले. तसेच तेथे असलेल्या एका खड्ड्यात या चौघांना पुरण्याचा प्रयत्न केला गेला.
या मारहाणीत महिलांना ही मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहे. या प्रकरणात स्थानिक शेतकरी आडवे आल्यामुळे सदर अनर्थ टळला. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढण्याच्या बाता करणारे भाजपा सरकार आपल्या कार्यकर्त्यावर काय कारवाही करतात हे येणाऱ्या दिवसात दिसून येईल. या प्रकरणी ज्ञानेश्वर खांडेभराड यांनी दिलेल्या फियार्दीवरून टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये रावसाहेब भवर यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.