Skip to content Skip to footer

कुर्बान मेरी जान तुझपे शाद रहे तू…

सायली क्षीरसागर

पुलवामामधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुढे काय होईल याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील जैश-ए-महंमदचे तळ उध्वस्त केले. याचे उत्तर म्हणून कधीही न सुधारलेल्या पाकने राजौरी, नौशेरा भागात आपली विमाने घुसवली… यांनाच पिटाळून लावताना मिग-21 वर स्वार झालेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकच्या तावडीत सापडले! आणि सुरू झाला त्यांना परत भारताता आणण्याचा संघर्ष.

अभिनंदन यांच्या व्हिडिओतील तडफदारपणा, निडरता बघून अभिमान वाटत होता. काल जेव्हा पाकने शेवटच्या क्षणालाही डॉक्युमेंटेशनच्या नावाखाली अभिनंदन यांना सोडण्यास उशीर केला तेव्हाही प्रत्येक भारतीयाच्या मनात चीड निर्माण झाली होती. अखेरीस अभिनंदन त्याच तडफदारपणाने, छाती उंचावत, न डगमगता चेहऱ्यावर निडर भाव ठेवत भारतात आले… सबंध देश त्यांची वाट पहात होता… अभिनंदन आले… सुखरूप आले… आणि पुन्हा आठवले ते हुतात्मा झालेले 40 जण!

14 फेब्रुवारी, संध्याकाळी 6-6.15 ची वेळ… नुकतंच चहा पिऊन वर आलो होतो, ऑफिसमध्ये आल्यावर कळलं की जम्मू-काश्मिरमधल्या पुलवामाच्या अवंतीपोरा भागात दहशतवाद्याच्या एका गाडीने सीआरपीएफच्या बसला धडक देऊन प्राणघाती हल्ला घडवून आणलाय… प्राथमिक माहितीनुसार 13 जवान हुतात्मा झाले होते. या हादरवून टाकणाऱ्या बातमीबरोबरच आमची इतर कामं सुरूच होती. कामाच्या व्यापामुळे त्यावेळी या हल्ल्याची तीव्रता तितकी जाणवली नाही, पण घरी आल्यावर टीव्हीवर सुरु असलेल्या बातम्यांमधून आणि तिथली भयानक दृश्य बघून सुन्न झालं आणि आपण इथं किती सुखात राहतोय हा विचार करून पहिल्यांदाच चीड-चीड झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळपासून डोकं जरी कामात असलं, तरी मन त्या हुतात्म्यांच्या वाट बघत असलेल्या आईचंं, त्याचं रूप एकदा शेवटचं डोळ्यात साठवण्यासाठी धडपडणाऱ्या बायकोचं, लहानपणापासून अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या त्या बापाचं आणि कुशीत असलेल्या अगदी काही महिन्यांच्या बाळाचं विचार करतंय… 40 जणांच्या 42 गोष्टी ऐकून डोळ्यात पाणी येतंय आणि पुन्हा आपण इथे बसून काहीच करू शकत नाही याचा राग येतोय.

लुका छुपी बहुत हुई सामने आजा ना।
कहाँ कहाँ ढूंडा तुझे थक गई है अब तेरी माँ।।

या हल्ल्याची भीषणता बघता आपल्या माणसाला शेवटचं डोळे भरून बघणं आणि शेवटचे संस्कार करणं हे तरी त्या कुटुंबाच्या नशिबात असेल का?

काल पासून त्या सगळ्या वीरजवानांच्या गोष्टी ऐकतीय… कोण नुकतंच सुटी संपवून भारतमातेच्या सेवेत रुजू झालं, तर कोण या मोहिमेनंतर सुटीवर जाणार होतं. कोण नुकतंच प्रशिक्षण संपवून कर्तव्यावर गेलं होतं तर काहींना आपल्या नुकत्याच झालेल्या लेकरांना भेटायची ओढ होती… पण एका निर्दयी हल्ल्यानं सगळंच उध्वस्त केलं.. हल्ला एक पण याची झळ 40 कुटुंबांना बसली. कधीही भरून न निघणारं नुकसान आणि ते माणूस परत कधीच भेटणार नाही हे अंगावर काटा आणणारं सत्य!

पण ही खदखद काही एका हल्ल्याची नाहीये… आजपर्यंत भारतमातेवर झालेल्या असंख्य भेकड हल्ल्यांमुळे पोखरत चाललेल्या अस्तित्वाची आहे. सरकारनं अत्यंत कणखरतेनं पाऊल उचलून शत्रूला नेस्तनाबूत करणंच उचित ठरेल… ‘इंडिया वाले कुछ नही करते.. ये सिर्फ बाते करते रहते है’ असं म्हणण्याचे दिवस आता संपले.

आज प्रत्येक भारतीय जात-पात, राजकारण, वाद-विवाद, चर्चा याच्या पलीकडे जाऊन ‘भारतीय’ या नात्यानं बोलतोय, मत मांडतोय. हे बघून समाधान वाटतंय. त्या भ्याड शेजाऱ्याला ‘करारा जवाब’ नक्कीच मिळेल अशी आशा!

शेवटी….
ए वतन, वतन मेरे आबाद रहें तू।
मैं जहाँ रहू, जहाँ में याद रहें तू।।

त्या गेलेल्या 40 वीरजवानांच्या मनात आजही हेच असेल की भारतमाता सुखरूप राहू दे…

Leave a comment

0.0/5