हिंदुस्थानच्या हवाईदलाने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानमधील बालाकोट येथे घुसून जैश ए मोहम्मदचे तळचं जमीनदोस्त केले. त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी लगेचच जैशच्या दुसऱ्या कॅम्पमधील मुलांना सुरक्षित स्थळी हलवले अशी माहिती समोर आली आहे. या कॅम्पमध्ये राहणाऱ्या एका मुलाच्या नातेवाईकाने ही माहिती दिली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्रात याबद्दल माहिती देण्यात आली आहे. एअर स्ट्राईकसाठी हिंदुस्थानी हवाई दलाने बालाकोट येथील जाभा टॉप नावाच्या डोंगराळ भागात असलेल्या जैशच्या मदरसा तालीम उल कुराण या तळाला लक्ष्य केलं होतं.एअर स्ट्राईक होण्याच्या आठवड्याभरापूर्वीच पाकिस्तानी सैनिकांनी जैशच्या तळाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली होती. 26 फेब्रुवारी रोजी पहाटे अचानक बॉम्ब स्फोटाचा मोठा आवाज आला. त्यामुळे या भागापासून काही अंतरावर असलेल्या जैशच्या इतर कॅम्पमध्ये राहणारी मुलं झोपेतून उठली. त्यानंतरही बराचवेळ जवळच बॉम्ब स्फोटाचे आवाज येत होते. काहीवेळानंतर पाकिस्तानी सैनिक आले व त्यांनी मुलांना तेथून बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी हलविले. तेथे तीन ते चार दिवस राहिल्यानंतर मुलांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. पण या दरम्यान नेहमी दिसणारी अनेक माणसं व तरुण अचानक दिसेनाशी झाल्याचे एका मुलाने सांगितले आहे.