Skip to content Skip to footer

युद्धातील मृतांचा निश्चित आकडा सांगणे अशक्य, का ते वाचा सविस्तर

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानवर हवाई हल्ला करत जैश ए मोहम्मदचे अड्डे उध्वस्त केले होते. या हल्ल्यामध्ये किती दहशतवादी मेले यावरून सध्या देशातील वातावरण तापले आहे. सुरूवातीला अंदाजे 350 पर्यंत दहशतवादी ठार मारण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी एका सभेमध्ये बोलत असताना हा आकडा 250 असल्याचं म्हटलं आहे.

लक्ष्यभेद हे आमचं काम; किती मेले हे मोजणं नव्हे! हवाईदल प्रमुखांचा ‘सर्जिकल स्ट्राईक

हवाईदलप्रमुख बी.एस.धनोआ यांनी हल्ल्यात किती जण मेले हे मोजण्याचे काम आमचे नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. या हल्ल्यात नेमका किती जणांचा खात्मा झाला यावरून देशातील सामान्य नागरीक संभ्रमावस्थेत आहे. खरी बाब ही आहे की कोणत्याही युद्धामध्ये मृतांचा आकडा निश्चितपणे सांगणं कठीण असतं.

मृतांची मोजणी कोणी करायची ?
युद्धामध्ये किती जणांचा मृत्यू झाला याची निश्चित मोजणी कोणताच देश किंवा संघटना करीत नाही. हा आकडा अंदाजाने काढलेला असतो. आजवरच्या कोणत्याही युद्धात मृत्यूमुखी पडलेल्यांचा निश्चित आकडा सांगता आलेला नाहीये कारण या युद्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर नरसंहार झालेला असतो. दोन देशांमध्ये युद्ध भडकतं तेव्हा मृतांची मोजणी करण्याचं काम स्थानिक प्रशासनावर असतं. तिथलं सरकार जो आकडा निश्चित करते तोच आकडा स्थानिक प्रशासनातर्फे जाहीर केला जातो. ज्या युद्धांमध्ये अधिक देश सहभागी झालेले असतात त्या युद्धांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या संयुक्त राष्ट्र जाहीर करत असतं, मात्र त्यांची संख्या ही देखील अंदाजावरच आधारीत असते.

मृतांची संख्या कशी मोजली जाते?
मृतांचा आकडा निश्चित करण्यासाठी अॅक्टीव्ह आणि पॅसिव्ह सर्वेलन्स अशा दोन पद्धतींचा वापर केला जातो. अॅक्टीव्ह सर्वेलन्स पद्धतीमध्ये मृतदेहांची मोजणी केली जाते किंवा युद्धाची झळ बसलेल्या भागाचे सर्वेक्षण केले जाते. नमूना सर्वेक्षणाचा आधार घेऊन मृतांचा आकडा निश्चित केला जातो. पॅसिव्ह सर्वेलन्समध्ये माध्यमे, रुग्णालये, शवागरे, सुरक्षा दले आणि तटस्थ संस्थांद्वारे गोळा केलेल्या माहितीवरून मृतांचा आकडा निश्चित केला जातो. हा आकडा अनेकदा मृतांच्या खऱ्या आकड्याजवळ जाणारा असतो असे सांगितले जाते.

आकडा निश्चित करण्यात येणाऱ्या समस्या
आकडा निश्चित करण्यासाठी माहिती कोण देतो यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. 1994 साली रवांडामध्ये झालेल्या नरसंहारात 5 ते 10 लाख जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं. इराकमध्ये इसिसविरूद्धच्या संघर्षात किती जणांचा मृत्यू झाला हे अजूनही निश्चित सांगता येत नाहीये. त्यामुळे अमेरिकेने इसिसविरूद्ध लढणाऱ्या सैन्याकडून आलेला आकडाच आजपर्यंत ग्राह्य धरला आहे. अनेकदा पराभूत देशांकडून मृतांचा आकडा कमी दाखवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आकडा जास्त असल्यास आपल्यावर शत्रू देश भारी पडला हा संदेश जगात जातो त्यामुळे हा आकडा दाबण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. हल्ला करणारा देश हा आकडा वाढवून सांगण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आकडा निश्चित कोणाचा मानायचा याबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो.

Leave a comment

0.0/5