Skip to content Skip to footer

दहा मिनिटात अडीज किलो सोने लुटले?

रहाटणी येथील कोकणे चौकाजवळ असलेल्या पुणेकर ज्वेलर्स या सराफी दुकानात लुटीची घटना घडली. भर दिवसा लुटारूंनी सराफी व्यावसायिकावर गोळीबार करून दागिने लुटून नेले आहेत. दुकानात डिस्प्ले बोर्डावर लावलेले, त्याचबरोबर दुकानातील तिजोरी उघडून सुमारे अडीज किलो अर्थात 62 लाख 50 हजार रुपये सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार केवळ दहा मिनिटात झाला असल्याचेही बोलले जात आहे. याबाबतचा नेमका आकडा गुन्हा दाखल केल्यानंतरच पुढे येणार आहे. दरम्यान, साडेतीन किलो सोने चोरून नेल्याची चर्चा परिसराततील नागरिकांमध्ये सुरु आहे.

याबाबत पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे म्हणाले, “चार इसम आले. त्यांनी दुकानाचे शटर बंद करून बंदुकीचा धाक दाखवला. बंदुकीच्या धाकाने सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. किती दागिने चोरीला गेले याबाबत फिर्याद घेण्याचे काम सुरु आहे. फिर्याद घेतल्यानंतर किती दागिने होते, याबाबत निश्चित माहिती मिळेल. घटनेची दखल पोलिसांकडून गांभीर्याने घेतली जात आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाची पथके, गुन्हे शाखेची दोन्ही पथके, खंडणी दरोडा विरोधी पथक आणि स्थानिक पोलीस या तपास पथकात सहभागी झाले आहेत. तांत्रिक मुद्द्यांसह सर्व पातळ्यांवर तपास सुरु करण्यात आला आहे.”

पुणेकर ज्वेलर्सच्या दुकानाच्या शेजारी असलेले हार्डवेअरचे दुकानदार हेमंत चौधरी म्हणाले, “मी दुकानात ग्राहक सांभाळत होतो. त्यावेळी आरोपींचा एक साथीदार माझ्या दुकानात आला. त्याने सुरुवातीला वायर मागितली. त्यानंतर त्याने वायर फिटिंगच्या पट्ट्यांची मागणी केली. त्या पट्ट्या दिल्यानंतर त्याने आणखी दहा पट्ट्या मागितल्या. त्या पट्ट्या देत असताना एक महिला आली, ती काहीतरी बोलत असताना तो साथीदार दुकानातून निघून गेला. त्याने दुकानासमोरचा रस्ता ओलांडला आणि त्यानंतर तो पळत गेला.”

 

  • पिंपरी-चिंचवड सराफ असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप सोनिगरा म्हणाले, “भरदिवसा गोळीबार करून सराफी दुकान लुटले आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सराफी व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दुकानातील सर्व दागिने चोरून नेले आहेत. दिव्यांग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलीस फिर्याद घेण्याचे काम करत आहेत. त्यानंतर नेमका आकडा समोर येणार आहे. या घटनेचा लवकरात लवकर तपास करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड सराफ असोसिएशनच्या वतीने पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे करण्यात येणार आहे.

 

Leave a comment

0.0/5