पुलवामामधील हल्ल्यानंतर जेवढी फजिती पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली आहे, तेवढी क्वचितच अन्य कोणत्या देशाची झाली असावी. आधी पाकिस्तानने या हल्ल्याशी आपला काही संबंध असल्याचे थेट नाकारले आणि भारताकडे पुराव्यांची मागणी केली. त्यानंतर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दहशतवादाविरोधात कारवाई केल्याचे नाटक केले. मात्र पाकिस्तानची काळी कृत्ये एवढी जगजाहीर झाली आहेत, की जागतिक समुदायाला हे काही पटणे शक्यच नव्हते. त्यामुळे या संदर्भात काही तरी करण्यासाठी त्याच्यावर दबाव येणे स्वाभाविक होते आणि त्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.
जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याच्या भावासहित अनेक दहशतवाद्यांना पाकिस्तानने अटक केली आहे. तसेच मसूद आपल्याकडे राहत असल्याची कबुली देणेही पाकिस्तानला भाग पडले आहे. परराष्ट्रमंत्री महमूद कुरैशी यांनी सीएनएनशी बोलताना पहिल्यांदा जाहीररीत्या याची कबुली दिली. ही मुलाखत देताना कुरैशी यांची उडालेली भंबेरी पाहण्यासारखी होती. कारण मसूद अझहर हा आपल्याकडे राहत असल्याचेच पाकिस्तान आतापर्यंत नाकारत होता. मात्र पाकिस्तान हा दहशतवादी संघटनांना पाळत असून भारताविरोधात छुपे युद्ध लढण्यासाठी त्यांचा वापर करत आहे, हे कुरैशी यांच्या कबुलनाम्यामुळे स्पष्ट झाले आहे. अर्थात पाकिस्तानचे वाकडे शेपूट आजही सरळ झालेले नाही. म्हणूनच पाकिस्तानी न्यायालयात टिकतील, असे पुरावे भारताने द्यावेत अशी मागणी कुरैशींनी केली आहे. मुळात भारताला पुराव्यांच्या जंजाळ्यात अडकावयाचे आणि या दहशतवाद्यांना मोकळे रान द्यायचे, हा पाकिस्तानचा कावा आहे. म्हणून पंतप्रधान इम्रान खान यांनीही बालकोटच्या हवाई कारवाईपूर्वी अशीच मागणी केली होती.
अर्थात पाकिस्तानच्या अंगणात खेळणाऱ्या या दहशतवादी कार्ट्यांचे पुरावे मागणारे खान हे काही पहिले नेते नाहीत. जनरल झिया यांच्या काळापासून हा खेळ चालू आहे. भारताकडूनही कित्येक दशकांपासून याबद्दलचे ठोस आणि निर्विवाद पुरावे देण्यात येत आहेत. परंतु झोपलेल्याचे सोंग करणाऱ्या पाकिस्तानने या पुराव्यांना काडीचीही किंमत दिलेली नाही. मात्र आता पाणी एकदम तोंडाशी आल्यानंतर त्याला काही तरी करणे भाग आहे. मसूद अझहर पाकिस्तानातच राहतो याबाबत आता कोणतीही शंका राहिलेली नाही. कारण मसूद हा सध्या मूत्रपिंडाच्या आजाराने गंभीर आजारी असून घरातून कुठे जाऊही शकत नाही, इतके सुद्धा कुरैशी यांनी सांगून टाकले. एवढेच नव्हे तर मसूदला अटक करण्यात आल्याच्याही बातम्या होत्या, मात्र त्याला दुजोरा मिळू शकलेला नाही. अर्थात जर मसूदच्या या आजारपणाची इतकी बारीकसारीक माहिती कुरैशींना माहीत असेल, तर त्याची अन्य माहितीही त्यांच्याकडे असायला काही हरकत नसावी.
मसूद अझहर हा खूप वर्षांपासून भारतासाठी हवा असलेला गुन्हेगार आहे. मुंबईतील 26/11 च्या नागरिकांवरील हल्ल्यांपासून पठाणकोट, उरी आणि नगरोटा येथील लष्करी तळांवरील हल्ल्यांपर्यंत मुख्य सूत्रधार म्हणून त्याचेच नाव येते. पुलवामातील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यामागेही त्याचाच मेंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द पाकिस्तानचे माजी हुकूमशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी मसूद अझर हा दहशतवादी असल्याचे 2016 मध्ये म्हटले होते. मसूद हा त्या देशातील काही बॉम्बस्फोटांत गुंतलेला असल्याचे त्यांनी म्हटले होते. ‘न्यूज नेशन’ या वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले होते. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही आपल्या एका मुलाखतीत मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचे मान्य केले होते.
अशा प्रत्येक हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी ठोस पुरावे गोळा केले आणि पाकिस्तानकडे सोपविले. मात्र या पुराव्यांची बूज राखणे तर दूर, पाकिस्तान मसूद आपल्याकडे आहे, हे मान्य करायलाही तयार नव्हता. मात्र आता परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे, की मसूदला लपविणे आता त्याला शक्य नाही. पाकिस्तान हा दहशतवादाचा पोशिंदा आहे, हे भारत विविध व्यासपीठांवर वारंवार सांगत आला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायालाही भारताची ही भूमिका पटू लागली आहे. त्यामळे आज भारतच नव्हे तर अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनही मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राच्या प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या यादीत टाकायला तयार आहेत. आता पाकिस्तानला खरोखर शांती हवी असेल, तर मसूद अझहरला भारताकडे सोपविण्यावाचून त्याला पर्याय नाही. मसूद अझहर हा भारतात दहशतवादी हल्ले करण्याचा आरोपी आहे आणि त्याच्यावर भारतीय कायद्यानुसार कारवाई होईल, ही भारताची भूमिका आहे. त्यामुळे अशा कोलांटउड्या मारून पाकिस्तानला काहीही फायदा होणार नाही. खोट्याच्या कपाळी गोटा या न्यायाने आज तो उघडा पडला आ