अहमदाबाद : भारत-पाकिस्तान सागरी सीमेवर पाकिस्तानच्या चोरांनी भारतीय मच्छिमारांना लुटल्याची घटना घडली. गुजरातच्या कच्छ येथील सागरी सीमेलगत पाकिस्तानच्या चोरांनी दोन भारतीय बोटींना लुटले. या सागरी सीमेवर अत्यंत कडक सुरक्षा तैनात असतानाही या चोरांनी सुरक्षा यंत्रणा भेदली आणि हा प्रकार घडला.
भारतीय हवाई दलाने केलेल्या एअरस्ट्राईकच्या कारवाईनंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांत मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तसेच सागरी सीमेवरही भारतीय नौदलाकडून करडी नजर ठेवली जात आहे. तरीदेखील या सुरक्षाव्यवस्था भेदत चोरांनी भारतीय मच्छिमारांना लुटले. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालकोट भागात एअरस्ट्राईकची कारवाई केली. या कारवाईनंतर संपूर्ण देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
दरम्यान, भारत-पाकिस्तानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नौदलाकडूनही मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. सागरी सीमेलगत जावू नये, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रशासनाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मच्छिमार समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात असतात. त्यातूनच हा प्रकार घडल्याची शक्यता आहे.