पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानला त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर दिले. हिंदुस्थानच्या वायुसेनेने पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांना घुसून मारले. मिराज-2000 या लढाऊ विमानांच्या ताफ्याने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर तुफान बॉम्बफेक करून शहिदांचा बदला घेतला होता. हिंदुस्थानने एअर स्ट्राईक केल्याचे जगजाहीर असले तरी पाकिस्तानची मात्र लपवाछपवी सुरू आहे. पाकिस्तानी सैन्य आणि सैन्याधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना हिंदुस्थानने एअर स्ट्राईक केलेल्या जागी जाण्यास मज्जाव केला आहे.
Air Strike प्रत्येक विमानातून 70 ते 80 किलोचे स्फोटकांचा मारा, सैन्याधिकार्याची माहिती
हिंदुस्थानच्या लढाऊ विमानांनी जैशच्या ठिकाणांवर बॉम्बफेक करत अनेक दहशतवाद्यांना ठार केले. परंतु पाकिस्तान मात्र हिंदुस्थानने एअर स्ट्राईक केलाच नाही असा आव आणत आहे. एकीकडे हल्ला झाला नाही असे म्हणत असताना दुसरीकडे पाकिस्तानी सैन्य मात्र हिंदुस्थानने हवाई हल्ला केलेला बालाकोट येथील मदरशा आणि आजुबाजुच्या इमारतींमध्ये जाण्यास प्रसारमाध्यमांना बंदी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना येथे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानची लपवाछपवी समोर आली आहे.
पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात हिंदुस्थानचे 40 जवान शहीद झाले. यानंतर 26 फेब्रुवारीला हिंदुस्थानने पाकिस्तामध्ये घुसून जैशच्या ट्रेनिंग कॅम्पवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर हिंदुस्थानचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी जैशच्या दहशतवादी तळावर हल्ला केल्याचे सांगितले होते. यात जैशचे दहशतवादी, ट्रेनिंग घेणारे दहशतवादी आणि कमांडर ठार झाल्याचे गोखले यांनी सांगितले होते.