Skip to content Skip to footer

ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या रिसॉर्टस्चे कुंपण काढण्याचा आदेश

ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या रिसॉर्टचे कुंपण काढण्याचा आदेश स्थानिक वन प्रशासनाने दिला आहे. वन्यजीवांच्या मार्गावर ही कुंपणे असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे बांधकाम झालेल्या कुंपणांना तोडण्याचं नुकसान रिसॉर्टमालकांना सोसावं लागणार आहे.

ताडोबाचं प्रवेशद्वार असलेल्या मोहर्लीपासून भामडेळी-सीतारामपेठकडे जाणा-या मार्गावर अनेक रिसॉर्ट तयार झाले आहेत. या गावांना लागूनच इरई धरण आहे. या धरणातील पाणी पिण्यासाठी ताडोबातील प्राणी जंगलातून याच मार्गे धरणावर जातात. मात्र, धरण आणि जंगल यामध्ये काही रिसॉर्ट बांधण्यात आले आहेत. प्रत्येक रिसॉर्ट मालकानं आपल्या जागेला कुंपण घातलं आहे. रिसोर्टमध्ये थांबणा-या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हे कुंपण घातलं गेलं. मात्र, हेच कुंपण त्यांच्या अंगलट आलं आहे. या कुंपणांमुळं वन्यप्राण्यांचा रस्ता अडतो. पाण्याकडे त्यांना जाता येत नाही. परिणामी ते गावात किंवा रिसॉर्टमध्ये घुसू शकतात. याचा परिणाम वन्यजीव आणि पर्यटकांवर होऊ शकतो. हे टाळण्यासाठी ताडोबाच्या बफर झोन विभागानं एक नोटीस जारी केली आहे. ही नोटीस २४ रिसॉर्ट मालकांना पाठवण्यात आली असू. त्यात ३० दिवसांत कुंपण काढण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच आदेशाचे पालन न केल्यास रिसोर्ट बंद केलं जाईल, असा इशारा देण्यात आल्याने रिसॉर्ट मालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

या आदेशात एकूण जागेच्या १० टक्के जागेवर कुंपण करावं, असं म्हटलं आहे. पण कर्मचारी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रिसोर्टमालकांनी आपल्या संपूर्ण जागेवर कुंपण केलं आहे. मालकीच्या जागेवर केवळ १० टक्के भागात कुंपण घालायचं, तर इतर जागेचं काय करायचं, असा प्रश्न रिसोर्टमालकांना पडलाय. यातून मार्ग काढण्यासाठी आता रिसोर्टमालकांनी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. यासंदर्भात ताडोबा बफर झोनचे उपवनसंरक्षक गुरु प्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बाहेर असल्याचं सांगून रिसॉर्टमालक या आदेशाच पालन करण्यास तयार आहेत, असं सांगितलं.

Leave a comment

0.0/5