25 गावांतील नळपाणीपुरवठा बंद पडण्याच्या मार्गावर : सुमारे 75 हजार एकर शेती धोक्यात
बिजवडी- उजनी धरणातील पाणीपातळी मायनसकडे वाटचाल करीत आहे. यामुळे समृद्ध झालेल्या इंदापूर तालुक्यातील सुमारे 25 गावांतील नळ पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच सुमारे दीड लाख एकर बागायती शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे उजनी बॅकवॉटर क्षेत्रातील ग्रामीण अर्थकारणावर दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहे.
उजनी धरणाच्या पाण्यामुळे इंदापूर, दौंड तालुक्यातील बागायती पट्टा सुजलाम् सुफलाम झाला आहे. यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे उजनी काठावरील नागरिक आणि शेतकरी धास्तावले आहेत. त्याचा दूरगामी परिणाम अर्थकारणावर होत आहे. 2016 मध्ये उजनी धरणातील पाणीपातळी मायनसमध्ये गेली होती. त्यावेळी पाणीप्रश्न बिकट झाला होता. त्यानंतर दोन वर्षांनी पाणीपातळी खालावली आहे. इंदापूर तालुक्यातील उजनी बॅकवॉटर कार्यक्षेत्रातील सुमारे 25 गावे समाविष्ट आहेत. या गावांतील नळपाणी पुरवठा योजना आणि शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव, कांदलगाव, शहा, माळवाडी, शिरसोडी, पिंपरी, पडस्थळ, कालठण, गंगावळण, पळसदेव, भिगवण, डिकसळ यासह सुमारे 25 गावे बॅकवॉटरच्या टापूत येतात. येथील एकूण शेतीचे क्षेत्र हे सुमारे 75 हजार एकर आहे. ऊस, केळी, द्राक्षे, डाळिंब आदी नगदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. या पाण्यामुळे या परिसरातील अर्थकारण गतीमान झाले आहे. त्याचा परिणाम चांगला झाला असल्यामुळे ही गावे सधन आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनली आहेत.
- नळपाणीपुरवठा योजनेत ठणठणाट
उजनी पाणलोट क्षेत्रातील सुमारे 25 गावांतील नळपाणीपुरवठा योजनांमध्ये पाण्याचा ठणठणाट सुरू आहे. पाणीपातळी खालावली असल्यामुळे योजनेचे जॅकवेल कोरडे पडले आहेत. त्यामुळे अजून उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वीच नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अजून तीन महिने उन्हाळा असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दिवसा चांदणे चमकत आहेत. पाणीटंचाईमुळे शेती उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. बॅकवॉटरच्या काठावरील कृषीपंप आता पाण्याविना सताड उघडे पडले आहेत. पाणीपातळी खालावत असल्यामुळे कृषीपंप नदीपात्रात घेऊन जावे लागत आहेत. शेतकऱ्यांना पाईप वाढवून कृषीपंपाव्दारे पाणी उपसा करण्याची वेळ आली आहे. ही खर्चिक बाब शेतकऱ्यांना सतावत आहे.