Skip to content Skip to footer

500, 1000च्या किती नोटा जमा झाल्या? RBI कडे नोटाबंदीच्या काळातील हिशोबच नाही

नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा लोकांनी स्वतः बँकेत तर भरल्याच पण त्याचबरोबर लोकांनी पेट्रोलपंपांवर इंधन भरण्यासाठी त्याचा वापर केला. लोकांकडचा पैसा अशा प्रकारे पेट्रोलपंपांच्या माध्यमातून बँकांमध्ये गेला. मात्र, अशा प्रकारे विविध 23 सेवांमधून किती पैसा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आला, याचा हिशेब आपल्याकडे नाही, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.

माहिती अधिकार कायद्याखाली ही माहिती उघड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016मध्ये 500 आणि 1000 हजार रुपयांच्या नोटांबंदी जाहीर केली. मात्र, नोटाबंदीच्या काळात पेट्रोलपंपांसह 23 अत्यावश्यक सेवांमध्ये जुन्या नोटांचा वापर करायला सरकारने परवानगी दिली होती. मात्र, या सेवांच्या माध्यमातून किती रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा झाली, याची माहिती खुद्द आरबीआयकडेच नाही. दोन्ही नोटा 25 नोव्हेंबरपर्यंत या सेवांसाठी घेतल्या जात होत्या. मात्र, त्यानंतर फक्त 500 रुपयांची नोट घ्यावी, अशी सूचना सरकारने केली. 1000 हजाराची नोट घेणे बंद केले. त्यानंतर 2 डिसेंबरपर्यंत 500 रुपयांची नोट 23 सेवांसाठी वापरली गेली. त्याचबरोबर काही विशिष्ट बँकांना 30 डिसेंबर 2016 पर्यंत जुन्या नोटा आरबीआयमध्ये भरायला परवानगी दिली होती. इन्श्युरन्स पॉलिसींचा हप्ता भरण्यासाठी जुन्या नोटांचा वापर करावा का, नाही, याचा उल्लेख सरकारने केला नसल्यामुळे त्या माध्यमातून किती पैसे भरले गेले, हेही माहीत नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

या सेवांना सवलत
नोटाबंदीनंतर सुमारे एक महिनाभर जुन्या नोटा पेट्रोलपंप, रेल्वे स्थानके, सार्वजनिक वाहतूक, विमानांची तिकिटे, दूध व्यवसाय, स्मशानभूमी, मेट्रो रेल तिकिटे, सरकारी-खासगी रुग्णालयातील औषधोपचार, औषधांची खरेदी, घरगुती गॅस सिलिंडर्सची खरेदी, रेल्वे कॅण्टीन, पाणी-वीज बिल, पुरातत्त्व खात्यातील वारसा वास्तू पाहाण्याची तिकिटे आणि टोल नाक्यांवर घेण्यास सरकारने परवानगी दिली होती.

Leave a comment

0.0/5