मालवण शहरात अमली पदार्थांचे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा गेले काही दिवस खुलेआम सुरू आहे. यात प्रामुख्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी गुंतले आहेत असेही बोलले जात आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी दोघा मुलांकडे पालकांनाच अमली पदार्थ सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान याची माहिती देण्यासाठी पालकांनी पोलीस ठाणे गाठले. मात्र तेथे पालकांचेच समुपदेश करण्यात आले. कोणतीही कारवाई झाली नाही. या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न न झाल्याने गंभीर प्रकरणावर थेट पडदा पडल्याने याची उलट सुलट चर्चा मालवण शहरात सुरू आहे. तर अमली पदार्थ कुठले होते याचा तपास झाला का ? असाही सवाल उपस्थित होत आहे.
मालवण शहर परिसरातील दोन वेगवेगळ्या मुलांच्या घरी संशयास्पद पदार्थ सापडून आल्याने कुटुंबीयांना धक्काच बसला आहे. त्यातील एक शालेय विद्यार्थी असून दुसरा महाविद्यालयीन असल्याचे समजते. गेले काही दिवस या दोन्ही मुलांवर पालकांचा संशय होता. त्यामुळे दोघेही घरात नसल्याचा फायदा घेत पालकांनी शनिवारी घरात शोधाशोध केली असता अडगळीच्या ठिकाणी अमली पदार्थ सदृश वस्तू सापडून आली. त्यानंतर एका मुलाच्या आईने थेट मुलासमवेत पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर काही वेळाने दुसऱ्या मुलाची आईदेखील पोलीस ठाण्यात आली. दोघांचेही विषय एकच असल्याचे पाहून पोलिसांनी दोन्ही मातांना चांगलेच कायदेशीर समुपदेश करत पुढील धोके सांगून विषय मिटविला गेल्याची चर्चा शहरात दोन दिवस सुरू आहे.
मालवण शहरात सध्या अमली पदार्थांचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. यामध्ये प्रामुख्याने 15 ते 25 वयोगटातील मुलं गुंतलेले असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मालवणातील हे युवक अमली पदार्थांच्या व्यसनाधीन झाले असून मागणी नुसार अमली पदार्थांची पाकिटे ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचा छुपा गैर धंदाही वाढीस लागला आहे.