सतराव्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रमुख पक्षांच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली. पण… निवडणुकीची चाहूल लागल्यापासून नेटिझन्स सोशल मीडियावर क्रियाशील होतात आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर लगेच आपापले अंदाज वर्तवू लागतात. त्यापैकी काही अंदाज काही प्रमाणात खरा ठरतो, असा अनुभव आहे. 2014 च्या निवडणुकीमध्ये नेटिझन्सनी ‘मोदी लाट’ असल्याची चर्चा सुरू केली अन् झालेही तसेच. निवडणुकीत कोणाची लाट आहे? याबाबतचा अंदाज काही प्रमाणात नेटिझन्सच वर्तवू शकतात…
लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काही वेळातच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नावे पुढील काही दिवसांत जाहीर होतील. उमेदवारी मिळण्यासाठी उमेदवारांची सर्वत्र धापवळ सुरू झाली आहे. पक्षांच्या कार्यालयामध्ये लगीनघाई सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात निवडणूक ज्वर निर्माण होऊ लागला असून, लोकशाहीच्या या महाकुंभमेळ्यात प्रत्येक इच्छुक उमेदवार शड्डू ठोकून उतरणार आहे. पक्षाची उमेदवारी मिळेपर्यंत अनेकांच्या झोपा उडणार आहेत. या दरम्यान फोडा-फोडीचे, नाराजी आणि बंडखोरीचेही राजकारण पहायला मिळणार आहे. निवडणुकीच्या नको-नको त्या प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसतात.
गेल्या काही वर्षांमध्ये निवडणूक ज्वरामध्ये सोशल मीडियाचा मोठा प्रभाव पहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा तारखा जाहिर केल्यानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबक आणि व्हॉट्सऍपग्रुपवर चर्चांचे फड रंगू लागले आहेत. यावरून राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहते आहे, याचा आंदाज बांधता येणं शक्य आहे. सोशल मीडियाच्या महत्त्वामुळेच निवडणूक आयोगानेही उमेदवारी अर्जांत काही बदल केले आहेत. त्यामध्ये सोशल मीडियाच्या वापरासंदर्भातील माहितीदेखील उमेदवारांकडून भरून घेतली जाणार आहे. सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. आवश्यक वाटल्यास त्यांचा खर्चदेखील उमेदवाराच्या निवडणुकीच्या खर्चात जमा धरला जाणार आहे. तसेच यावर “वॉच‘ ठेवण्यासाठी स्वतंत्र टीम असणार आहे. यावरून सोशल मीडियाचे वाढते महत्त्व दिसून येते.
2014 च्या निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावर मोदी लाटेची जोरदार चर्चा होती. आपले मत व्यक्त करताना, मतदारांचा कल मोदी लाटेच्या बाजूने असल्याचे नेटिझन्सनी सांगितले होते. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेमुळे भाजपला मोठा फायदा झाला होता. “मोदी विरुद्ध सर्व’ असेच स्वरूप या निवडणुकीला आणण्यात त्या वेळीही भाजपला यश आले होते आणि यंदाही तोच प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्या वेळी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करणारे 2014 चे राहुल गांधी आणि आताचे 2019 चे राहुल गांधी यांच्यात फार मोठा फरक पहायला मिळतो, हे वास्तव नाकारता येणार नाही.
नेटिझन्सनी 2014 मध्ये निवडणुकीपूर्वीच आपला अंदाज वर्तवताना भाजपची सत्ता येणार हे सांगून टाकले होते. अर्थात, झालेही तसेच. पण, त्यावेळेसारखी परिस्थिती आता आहे की नाही, हे सुद्धा नेटिझन्सच सांगू शकतात. कारण, एका अर्थाने लोकशाहीच्या महाकुंभमेळ्यासाठी ते आघाडीची भूमिका बजावत असतात. नेटिझन्सचा अंदाज हा इतर कोणत्याही अंदाजापेक्षा सरसच असतो. यंदा मोदी विरुद्ध सर्वच पक्षांची एकजूट झाली आहे. राजकीय चित्र काही दिवसातच स्पष्टही होईल. पण… नेटिझन्स सांगा, यंदा लाट कोणाची आहे? नमो विरुद्ध रागां… की नमो विरुद्ध सर्व विरोधक…. की पुन्हा एकदा मोदी…?