Skip to content Skip to footer

नोटाबंदी, बेरोजगारीवरून टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

सोनिया गांधी यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे टॉम वडक्कन यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांना केरळमधून भाजप उमेदवारी देणार हे जवळपास निश्चिक आहे. नोटाबंदी,बेरोजगारी या मुद्दावरून वडक्कन यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली होती. सोनिया गांधी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा असताना वडक्कन हे त्यांचे सचिव म्हणून काम पाहात होते. गांधी कुटुंबातील इतका जवळचा नेता भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसमधल्या अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.

वडक्कन यांनी प्रवेश झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं की हिंदुस्थानावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया ऐकून मी व्यथित झालो. जेव्हा माझ्या पक्षाने(काँग्रेसने) देशाच्या विरोधात भूमिका घेतली तेव्हा माझ्यासमोर पक्ष सोडण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता अशी प्रतिक्रिया वडक्कन यांनी दिली आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर वडक्कन यांनी काँग्रेसमधील घराणेशाहीवर देखील टीका केली. वडक्कन यांना काँग्रेसने आजपर्यंत काही महत्वाची पदे आणि जबाबदारी दिली आहे. ते काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते होते, याशिवाय अखिल भारतीय काँग्रेसचे ते महासचिव देखील होते. रोम कॅथलिक समुदायाच्या वडक्कन यांचा केरळमध्ये जनाधार चांगला आहे. यामुळे वडक्कन यांना उमेदवारी देऊन त्यांच्या जनाधाराचा पक्षासाठी फायदा उचलण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

Leave a comment

0.0/5