Skip to content Skip to footer

युवासेना नेते आदित्य ठाकरे भाडीपाच्या मंचावर….

इंटरनेट वापरणाऱ्या नेटकऱ्यांना ‘भाडिपा’ हे नाव आता नवे राहिलेले नाही. मराठमोळ्या नेटकऱ्यांसाठी स्टॅण्डअप कॉमेडी, वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओ, कास्टींग काऊच यासारखे अनेक प्रयोग आत्तापर्यंत भाडिपा अर्थात भारतीय डिजीटल पार्टीने केले आणि त्याला नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत भाडिपाच्या मंचावर अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली असून लवकरच या सेटवर शिवसेनेचे युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे हजेरी लावणार आहेत. काहीच दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांना युवा आयकॉन या मानांकनाने सम्मानित करण्यात आले होते. आज तरुणाचे प्रश्न असो की विध्यार्थी वर्गाचे प्रश्न त्यात जातीने लक्ष घालून सोडविण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करत असतात.

आजचा तरुणच उद्याची दशा आणि दिशा ठरवणार आहे. त्यामुळे सध्या पाहायला गेले तर राजकारणात नव्याने येणाऱ्या युवा नेतृत्वाकडे आजची तरुणाई आकर्षित होताना दिसते. राजकीय प्रचार सभा असो किंवा विविध आंदोलने, या मध्ये तरुणांच्या खांद्याला खांदा लावून आदित्य ठाकरे यांचा सहभाग असतोच. त्यामुळेच तरुणांचे प्रश्न सोडविण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी युवासेनेची बांधणी केली. या युवासेनेच्या माध्यमातून त्यांनी आजच्या युवकांचे अनेक प्रश्न सोडविले. त्याच कारणास्तव आज त्यांच्याकडे महाराष्ट्रातील युवकांचे दमदार नेतृत्व म्हणून पाहिले जाते.

युवा नेते आदित्य ठाकरे यांचा सध्याच्या राजकारणाकडे, आजच्या तरूणाईच्या प्रश्नांकडे बघण्याचा नेमका दृष्टीकोन कसा आहे हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न भाडिपा करणार आहे. मंगळवार १९ मार्चला शिवाजी मंदिर येथे सायंकाळी ६.०० वा. संवादक सविता प्रभुणे या आदित्य ठाकरे यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. ‘लोकमंच’ या उपक्रमांतर्गत तरुण मतदार आणि राजकारणी यांच्यातला संवादाचा दुवा साधण्याचे काम करणाऱ्या भाडिपाच्या ‘विषय खोल’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या भेटीला येणाऱ्या आदित्य ठाकरे यांची विविध विषयांवरील रोखठोक मते या संवादाच्या निमित्ताने जाणून घेता येणार आहेत.

Leave a comment

0.0/5