मुंबई : वंचित बहुजन आघाडीने वेगळे लढण्याचा निर्धार केल्यानंतर आता आघाडीला महाराष्ट्रात आणखी एक धक्का बसला आहे. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाने आता महाराष्ट्रात देखील लोकसभेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही पक्षांचा हा निर्णय आघाडीला मुंबईत मोठा धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात कॉंग्रेस-भाजप विरोधात लढणाऱ्या या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रात कॉंग्रेससोबत जाण्याची तयारी दाखविली होती. समाजवादी पार्टीने महाराष्ट्रात फक्त एक जागा मागितली होती. पण, काँग्रेसने त्याचीही तयारी दाखविली नाही. धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेण्याची काँग्रेसची मानसिकता दिसत नाही. सपा आणि बसपाची आघाडी आम्ही महाराष्ट्रातही कायम ठेवण्याचा निर्णय केला असून सर्व ४८ जागा लढणार असल्याचे, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, यापूर्वीच आघाडीत सामील न होता वंचित बहुजन आघाडीने वेगळे लढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा थेट भाजपला होईल असं राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आता समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाच्या या निर्णयामुळे आणखी भाजपचाच फायदा होईल हे स्पष्ट होत आहे.केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हटविण्याच्या कॉंग्रेसच्या प्रयत्नांना हा मोठा धक्का मानला जात आहे.