Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरे यांनी जिंकली नाशिकच्या युवकांची मने

आदित्य संवाद या आपल्या नव्या कार्यक्रमाद्वारे शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाशिक मधील युवक आणि युवतींशी संवाद साधला. शिक्षण, दुष्काळ, राजकारण ते स्थानिक अशा प्रश्नांना अभ्यासपूर्ण उत्तरे देत त्यांनी तरुणाईला जिंकले. ही निवडणूक देशासाठी लढतोय. देशाला मजबूत सरकार हवे आहे, मजबूर नव्हे यापुढेही राष्ट्रहिताचे प्रश्न शिवसेना मजबुतीने मांडेल, अशी ग्वाही त्यांनी दिली त्यामुळे उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाला आपली पसंती दर्शवली. काहीच दिवसांपूर्वी असाच कार्यक्रम संभाजी नगर येथे पार पडला होता तेथे सुद्धा युवकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

कश्मीरसाठी दुसरे राष्ट्रपती, दुसरे पंतप्रधान करू अशी भाषा ओमर अब्दुल्ला करतात तर दुसरीकडे काँग्रेस म्हणते ३७० कलम रद्द करणार नाही. अशा परिस्थितीत देशहित आणि विकासासाठी समविचारी भाजपशी युती केली. आपल्याला मजबूर नव्हे, मजबूत सरकार हवे आहे. यासाठी मतदान करा आणि आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहचवा अशी साद घालत शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या तरुणाईची मने ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रातून जिंकली. नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर सायंकाळी सहा वाजल्यापासूनच ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमासाठी तरुणांचा सागर उसळला होता. तरुणाच्या मनातील प्रश्नांनाच्या चिठ्या एका काचेच्या भांड्यात ठेवल्या होत्या. त्यातील एक-एक चिट्टी उचलत प्रश्नांची उत्तरे आदित्य ठाकरे देत होते.

आदित्य ठाकरे यांचा हा संवाद सुमारे दीड तास चालला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले. ग्रामीण भागातील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पोहचण्यासाठी काय कराल, या नीलेश राणे याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, क्रीडा हे क्षेत्र महत्त्वाचे आहे. मिड डे मिल, हेल्थ चेकअप, क्रीडा याद्वारेच बदल घडणार आहे. आपल्याकडे मुलांना खेळण्याची संधी मिळते तशी मुलींनाही मिळायला पाहिजे. पुणे विद्यापीठाचे नाशिकमध्ये उपकेंद्र लवकरच होईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. पुढे “आदित्य संवाद” हा कार्यक्रम १३ एप्रिल २०१९ ला कोल्हापूर शहरात होणार आहे असे ही सांगण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5