Skip to content Skip to footer

चंद्रकांत पाटील शेवटचे तीन दिवस बारामतीत, सुळे यांच्या अडचणीत वाढ

राष्ट्रवादी पक्षासाठी प्रतिष्टेची समजली जाणारी बारामती मतदार संघातील निवडणूक अधिक चुरशीची बनत चालली आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून सुप्रिया सुळे तर भाजपा पक्षाकडून कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ ‘मैं भी चौकीदार’मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विजयाची गुढी उभारून विजयाचे रणशिंग फुंकले आहे. शरद पवार दिल्लीत ज्या जागेवरून राजकारण करतात त्या जागेत बारामती मतदार संघाचा समावेश होतो आणि ही जागा राष्ट्रवादी कडून खेचुन आणण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी कंबर कसली आहे.

यावेळी बोलताना महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी आपली आगामी रणनीती स्पष्ट केली. बारामती मध्ये लीड मिळाल्याने जानकर पडले त्यामुळे मी स्वतः बारामतीत शेवटी तीन दिवस थांबणार आहे. चांगला दिवस पाहून पाच हजार कार्येकर्ते घेऊन बारामती मतदार संघात प्रचारात उतरणार. बारामती मतदार संघातील निवडणुक ही सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल मध्ये नसून ही निवडणूक देश तोडणारे आणि देश जोडणारे यांच्या मध्ये आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर तोफ डागलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येत आहे.

आपल्या छोट्याशा भाषणात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी देखील राष्ट्रवादीवर हल्लबोल केला. या निवडणुकीचा धसका घेऊन स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गल्लीतील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रत्येकाने या निवडणुकीत आपआपली जबाबदारी पार पाडली तर राष्ट्रवादीची ही कीड संपेल. ही निवडणूक जगन्नाथाचा रथ असून हा रथ प्रत्येकाने पुढे नेला पाहिजे असे सुद्धा शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी बोलून दाखविले होते. परंतु चंद्रांकात पाटील येणाऱ्या दिवसात बारामतीत काय खेळी खेळणार आणि त्याचा बारामतीत राष्ट्रवादीला कसा फटका बसणार हे लवकरच दिसून येईल.

Leave a comment

0.0/5