राज ठाकरे महाराष्ट्रात घेत असलेल्या भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील सभेमुळे भाजपाच्या गोटात खळबळ माजलेली दिसून येत आहे. याचा समाचार खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारा दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ‘या निवडणूकीत बारामतीकरांनी बारामतीत ३२ किलोमीटर परिसरात २ दिवसात ७ सभा घेतल्या. त्या कमी पडल्या की काय म्हणून आता साहेबांनी रेल्वेचं इंजिन भाड्याने घेतलं.’ असं म्हणत त्यांनी ‘पूर्वी लोक सायकल भाड्याने घेत होते, गाडी भाड्याने घेत होते, या निवडणुकीत मात्र शरद पवारांनी इंजिन भाड्याने घेतलं आहे. ते ही असं इंजिन भाड्याने घेतले जे म्युझियम मधील कोळशाचं इंजिन आहे. अशाने त्यांची बारामतीची गाडी पुढे सरकणार नाही’ अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अख्या महाराष्ट्राभर घेत असलेल्या सभांमुळे भाजपा पक्षाच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येत आहे. सोलापूर, इचलकरंजी, सातारा येथे सभा घेऊन भाजपा पक्षा विरुद्ध जोरदार बॅटिंग करताना राज ठाकरे दिसून येत आहे. त्यातच भाजपाच्या योजनांचा समाचार सुद्धा राज ठाकरे घेताना दिसून येत होते. परंतु स्वतः निवडणुकीच्या रिंगणात न उतरता इतरांसाठी बॅटिंग करणाऱ्या राज ठाकरे यांचा हा निर्णय मनसे कार्यकर्त्यांना आणि त्यांना मानणाऱ्या मतदारांना सुद्धा न पचणारा आहे. परंतु लोकसभेला भाजपाला विरोध करून राज ठाकरे विधानसभेची तयारी करत असताना दिसून येतात असेच राजकीय वर्तुळात बोलून दाखविले जात आहे.