दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतल्या एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहिता पथकातील अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी मिलींद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष पद देण्यात आले होते. परंतु या अध्यक्ष पदामुळे संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांच्यात वाद झाले होते.
देवरा यांच्या विरोधात काही दिवसांपुर्वी मतदारांना चुकीची माहिती देऊन आचारसंहितेचा भंग केला असल्याची तक्रार उच्च न्यायालयाचे वकील ऍड. धर्मेंद्र मिश्रा यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. जैन समाजातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी चुकीची माहिती पसरवून शिवसेनेची बदनामी करत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त अश्विनी कुमार यांच्याकडे ऍड. मिश्रा यांनी तक्रार केली होती. मिलिंद देवरा हे माजी केंद्रीय मंत्री असून, माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचे सुपुत्र आहेत. दक्षिण मुंबईत २०१४ साली शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. त्याआधी मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईचं प्रतिनिधित्व केलं होतं. यंदाही काँग्रेसकडून मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून रिंगणात आहेत