सध्या देशभरात निवडणुकीचा उत्साह पाहायला मिळत आहे. जिकडे-तिकडे उमेदवार आपल्या प्रचारासाठी नव-नवीन फंडा वापरात आहे. कोणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्टार प्रचारकाला बोलावतात तर कोणी अनोखी पद्दत वापरून मतदारांना आकर्षित करतात. परंतु दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या प्रचाराला वापरलेल्या अनोख्या पद्धतीमुळे मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आपल्या प्रचारासाठी एक रॅप सॉंग तयार केले आहे. आणि हे सॉंग संपूर्ण मतदार संघातील मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे.
धारावीत राहणारा जाफर शहा आणि संजय नागपाल या दोन तरुणांनी हे रॅप साँग तयार केलं आहे. दक्षिण मध्य मुंबईतून २०१४ मध्ये राहुल शेवाळे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी ५ वर्षाच्या कालावधीत या मतदारसंघात अनेक काम केलीत. त्यांच्या या कामामुळे हे दोघेही रॅपर प्रभावित झाले आणि त्यांना राहुल शेवाळे यांच्यावर रॅप गाण तयार करण्याची कल्पना सुचली. धारावीत राहणारे जाफर आणि संजय हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई व मुंबईकरांसाठी काही रॅप गाणी बनवतात. त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल शेवाळे यांच्या कामाची माहिती देणारे हे रॅप साँग तयार केलं. ‘शेर की दहाड है, राहुल शेवाळे’ असे या गाण्याचे बोल असून सध्या हे गाणं धारावी तसेच इतर ठिकाणी चांगलेच गाजत आहे.