येत्या २९ तारखेला लोकसभेसाठी चौथ्या टप्यात मतदान होणार आहे. त्यामुळे आता चौथ्या टप्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. विशेष म्हणजे उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने आज मुंबईत आणि ठाण्यात देशातील दोन दिग्गज नेते आपआपल्या पक्षाच्या प्रचारासाठी येणार आहेत. मुंबईमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत तर ठाण्यात आणि डोंबिवलीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रचार सभा घेणार आहेत. मोदींच्या उपस्थितीत आज भाजप-शिवसेना युतीची सांगता सभा होणार आहे. त्यामुळे भाजप आणि मित्रपक्षांकडून सभा जंगी होण्यासाठी आणि त्यात शक्तिप्रदर्शन करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानात संध्याकाळी ही सभा होणार आहे. सांगता सभा असल्याने या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विविध नेते उपस्थित राहणार आहेत.