कोल्हापुरात गोकुळ दूध संघाविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. गोकुळ दूध संघानं पशुखाद्याच्या दरात वाढ केल्यानं शिवसेनेनं आंदोलनाचा निर्णय घेतला. ऐरवी शिवसेना मोर्चा म्हटलं की प्रचंड घोषणाबाजी आणि शक्तिप्रदर्शन असं समीकरण. पण, कोल्हापुरात गोकुळ दूध संघावर काढलेल्या मोर्चाची सर्वत्र जोरात चर्चा होती. कारण, यावेळी शिवसेना म्हशी घेऊन जोरदार घोषणाबाजी करत गोकुळ दूध संघाच्या कार्यालयावर धडकली. पशुखाद्य दरवाढ रद्द करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली. शिवाय, गाईच्या दुध दरामध्येही वाढ करण्याची मागणी शिवसेनेनं केली. पशु खाद्याचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्याचे बजेट कोलमडणार असून पशुखाद्यामध्ये १०० रूपये दरवाढ अन्यायकारक असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. दरम्यान, यावर गोकुळ दूध संघ काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.
सध्या गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट करण्याच्या वादा वरून महाडिक गट आणि सतेज (बंटी) पाटील यांच्यात जोरदार वाद सुरु आहे आणि गोकुळ संघ महाडिक गटाच्या ताब्यातून खेचून घेण्यासाठी सतेज पाटील यांनी जोरदार ताकद लावलेली दिसून येते. गोकुळ दूध संघ मल्टि स्टेट करण्यासाठी महाडिक गटाने ताकद लावली होती परंतु ते मोडीस कढण्यासाठी पाटील यांनी शर्तीचे प्रयत्न केले होते. शिवसेना पक्षाचे लोकसभा उमेदवार संजय मंडलिक यांना सुद्धा महाडिक विरोधात जाऊन पाटील यांनी संपूर्ण पाठिबा दिला होता.