रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनील अंबानी हे लुच्चे भांडवलदार आणि अविश्वासार्ह उद्योजक असल्याचे विधान केल्यामुळे रिलायन्सने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना फैलावर घेतले असून पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या 10 वर्षांच्या राजवटीत आम्हाला 1 लाख कोटींहून अधिक रुपयांची कामे तुमच्याच सरकारने दिली. तेव्हा आम्ही कोण होतो, असा सवाल केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सतत दिशाभूल करणारी माहिती देणे, बदनामीकारक खोटे बोलण्याचा सिलसिला राहुल गांधी यांनी सुरूच ठेवला आहे. शनिवारी तर त्यांनी अनिल अंबानी यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करत लुच्चा भांडवलदार आणि अप्रामाणिक उद्योजक ठरवले. या विधानांचे कोणतेही पुरावे मात्र दिलेले नाहीत.
राहुल गांधी यांच्या सततच्या अशा विधानांकडे आम्ही रिलायन्स समूह म्हणून दुर्लक्ष करत आलो आणि संयम ठेवला. अशाच विधानांमुळे सध्या सुप्रीम कोर्टातही त्यांच्यावर एक खटला सुरू आहे. याकडे लक्ष वेधत रिलायन्सने म्हटले आहे की, तब्बल 1 लाखांहून अधिक कर्मचारी आणि 80 लाखांहून अधिक समभागधारक असलेला रिलायन्स समूह हा भारताचा सर्वात तरुण उद्योग समूह असून देशाच्या म्हणजेच भारताच्या विकासासाठी समर्पित आहे. असे असताना राहुल गांधी यांनी जी बिनबुडाची विधाने केली त्यांचा खुलासा करावा. काँग्रेस आघाडीच्या दहा वर्षांच्या राजवटीत म्हणजे 2004 ते 2014 या काळातच अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाला एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे प्रकल्प देण्यात आले होते.
यात पायाभूत सुविधा क्षेत्रातील वीज, दळणवळण, रस्ते, मेट्रो आदींचा समावेश होता. आम्हाला ही कामे देणारे सरकार तुमचेच होते. तेव्हा तुमच्या 10 वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत तुम्ही लुच्चा भांडवलदाराला आणि अप्रामाणिक उद्योजकालाच पाठिंबा देत होता काय, असा सवालही रिलायन्सने राहुल गांधींना केला आहे.