Skip to content Skip to footer

संभाजीनगर मधील कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन.

संभाजीनगर शहरातील कचराकोंडी सोडविण्यासाठी चार ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यापैकी चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. वीजपुरवठा सुरू होताच २ जूनला चाचणी घेण्यात येईल. १० जूनपर्यंत हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

शहरातील चार कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी बैठक घेतली. या बैठकीस मनपाचे दक्षता पथकप्रमुख एम. बी. काझी, घनकचरा व्यवस्थापनप्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्यासह प्रकल्पाचे कंत्राटदार, पीएमसीचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देताना महापौर घोडेले म्हणाले, पावसाळ्यापूर्वी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची तयारी केली जात आहे.

चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले आहे. मशीन बसविण्यात आली असून वीज पुरवठा मिळताच २ जून रोजी कचरा प्रक्रियेची चाचणी घेतली जाणार आहे. १० जूनपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. चिकलठाणा कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, पावसाळ्यापूर्वी लोकार्पण करून हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. या प्रकल्पामध्ये दररोज २५० टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करून त्यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे लोकार्पण करणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5