Skip to content Skip to footer

दिवसा हॉटेलात काम रात्री शाळा अशी तारेवरची कसरत मिळविले ७७ टक्के गुण

ज्या वयात महाविद्यालयात मित्र-मैत्रिणींसोबत मौजमजा करायची, त्या वयातच त्याच्या खांद्यावर घरची जबाबदारी येऊन पडली. त्यामुळे दिवसभर हॉटेलमध्ये  काम, तर रात्री शाळा करत गौरव मधुकर नरवत याने बारावीच्या परीक्षेत ७७.२३ टक्के मिळविले आहेत. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवल्यामुळे  त्याचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. त्यामुळे चिपळूणवरून रोजगाराच्या शोधात भावासह पुण्यात आला. मोठ्या भावासोबत तो हॉटेलमध्ये काम करू लागला. शिक्षणाची असलेली आवड व कष्ट करण्याची जिद्द, या जोरावर त्याने घरची जबाबदारी पूर्ण करत, शिक्षण देखील सुरू राहावे म्हणून, पूना नाईट ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आज त्याने १२ वीपर्यंतचा टप्पा यशस्वीरीत्या गाठला आहे. पूना नाईट ज्युनिअर कॉलेजमधून त्याने पहिला क्रमांक पटकाविला आहे.

भविष्यात चार्टड अकाउंटंट (सीए) व्हायचे असल्याने तो वाणिज्य शाखेत प्रवेश घेणार आहे. तसेच सीए होण्यासाठी तयारीदेखील सुरू केली आहे. त्याने मिळवलेल्या या यशाचे श्रेय त्याने आई, मोठा भाऊ व शिक्षकांना दिले आहे. पूना ज्युनिअर कॉलेजच्या वतीने देखील त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे. ज्युनिअर कॉलेजमधून दुसरा क्रमांक प्रथमेश दिलीप मोरे याने पटकाविला आहे. त्याला ७३.६९ टक्के गुण मिळाले आहेत. तो मूळचा कोकणातील असून पुण्याला मोबाईलच्या दुकानात काम करतो. शिक्षण हे अत्यंत मोलाचे असल्यामुळे १२ वीची परीक्षा तो यशस्वीरीत्या पास झाला आहे.  मुलींमधून पहिला क्रमांक रेखा जनार्दन सिरसाट हिने मिळविला आहे,  ७०.६१ टक्के गुण मिळाले आहेत. त्यांचे (वय ३६) आहे. घरगुती कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले, त्यामुळे पुन्हा आठवीपासून शिक्षण सुरू केले. चार मुलांचा अभ्यास घेऊन, तसेच दुकानात
काम करून त्याने १२ वी परीक्षेचा अभ्यास केला.

पूना नाईट ज्युनिअर कॉलेजचे एकूण ११४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कॉलेजचा निकाल ७२ टक्के लागला आहे.नियमित शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या तुलनेत रात्रशाळेतील विद्यार्थ्यांचा निकाल दिवसेंदिवस वाढत आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो, ग्रामीण भागातील गरजू व शाळाबाह्य मुलांना वर्ग ८वी ते १२ वीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.- अविनाश ताकवले, प्राचार्य, पूना नाईट ज्युनिअर कॉलेज

Leave a comment

0.0/5