Skip to content Skip to footer

जिथे कुंपणच खाते शेत..! एसआरपीएफच्या अधिकाऱ्याकडून ६२ लाखांचा अपहार

जिथे कुंपणच शेत खाते अशा ठिकाणी कुणी कुणाला दोष द्यायचा. अशी परिस्थिती सध्या एसआरपीएफच्या खात्यातील गैरव्यवहारावरुन पुढे आली आहे. एसआरपीएफच्या कॅन्टीनमध्ये होत असलेल्या गैरव्यवहाराने मोठी खळबळ उडाली आहे. सबसीडी कॅन्टीनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून होत असलेल्या अपहारबाबत संशय आल्यानंतर त्या गैरव्यवहाराची एका समितीमार्फत चौकशी केल्यानंतर खरा प्रकार समोर आला आहे. एसआरपीएफच्या अधिकाऱ्याने ६२ लाख ९८ हजार रुपयांचा अपहार केल्याचे चौकशी अहवालातून समोर आले आहे.

राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 चे सहायक पोलीस उपनिरीक्षक रणजित जगन्नाथ जाधव यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी याबाबत राज्य राखीव पोलीस बल गट क्र1 चे पोलीस कल्याण अधिकारी रमेश वेठेकर यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ही घटना 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 च्या कँन्टीनमध्ये घडली. फिर्यादी हे पोलीस निरीक्षक म्हणून राज्य राखीव पोलीस बल गट क्र 1 पुणे येथे कार्यरत आहेत.

त्यांनी याठिकाणी पोलीस कल्याणकार अधिकारी म्हणून काम पाहत असताना त्यांना एसआरपीएफ ग्रुप 1 मधील सबसीडी  कॅन्टीन मध्ये काही रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय आला. त्यांनी कॅन्टीनची तपासणी केल्यानंतर रकमेमध्ये आलेल्या तफावतीवरुन त्यांचा संशय बळावला. त्यांनी ही बाब राज्य राखीव पोलीस बल गट क्र 1 पुण्याचे समादेशक यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी या गैरव्यवहाराचा तपास करण्याकरिता एक चौकशी समिती स्थापन केली. त्या चौकशी समितीने सबसीडी कॅन्टीनमध्ये 60 लाख 98 हजार 956 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल दिला. यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही.बी.जगताप हे करत आहेत.

Leave a comment

0.0/5