शहर आणि परिसरात १७२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याबाबत राज्य शासनाच्या गृह विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे. संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी १ कोटी ३४ लाख ३० हजार ८०० रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे संपूर्ण बारामती शहरावर कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. शहरातील नागरिकांच्या प्रभावी सुरक्षिततेसाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते.
नगरपरिषद हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची माहिती सीसीटीव्हीमध्ये जतन करणे शक्य होईल. शिवाय गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मोठी मदत होईल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या सुरक्षिततेसाठी या प्रकल्पाबाबत आग्रही होते. त्यांनी पुढाकार घेउन याबाबत पाठपुरावा केला. त्यानुसार कॅ मेरे बसविण्याबाबत गृह विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
या प्रकल्पासाठी १ कोटी ३४ लाख ३० हजार ८०० रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी ७५ लाखांची रक्कम खासदार डी पी. त्रिपाठी यांच्या निधीतुन, तर ५९ लाख ३० हजार ८०० रुपयांची रक्कम बारामती नगरपरीषदेकडुन उपलब्ध होणार आहे. निविदा प्रक्रियेबाबत पोलीस अधिक्षकांनी कार्यवाही करण्यासाठी गृह विभागाने आदेश दिले आहेत. याबाबत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, बारामती शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने झालेला हा अत्यंत महत्वपुर्ण निर्णय आहे. खासदार डी. पी. त्रिपाठी यांच्या खासदार निधीतुन पैसे उपलब्ध होणार आहेत.
बारामती शहराची लोकसंख्या मोठी आहे.तसेच कार्यक्षेत्र देखील वाढले आहे. यासाठी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहराचा परिपुर्ण सर्व्हे करण्यात आला आहे. त्यानंतरच शहरातील महत्वाचे ‘लोकेशन’ ‘फायनल’ करण्यात आले. या लोकेशन च्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविल्यानंतर बहुतांश शहरावर कॅ मेऱ्याची नजर राहणार आहे.
महाविद्यालय परिसरातील विद्याथिर्नींचे होणारे छेडछाडीचे प्रकार रोखणे, महिलांची सुरक्षा या साठी सीसीटीव्ही महत्वाचे आहेत. शिवाय शहरात बिघडलेला ‘ट्राफिक सेन्स’ या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे सुधारण्यास चांगलीच मदत होइल. शिवाय शहरातील रस्त्यांवरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांवर जरब बसेल. अपघातांचे प्रमाण कमी होईल. शहरातील दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. सीसीटीव्हीमुळे दुचाकीचोर सहजपणे अशा चोऱ्या करण्यास धजावणार नाहीत.बारामती शहरात येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, शहराच्या हद्दवाढीसह १७२ सीसीटीव्ही कॅ मेºयाचा प्रस्ताव केला होता. यासाठी पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाहणी करण्यात आली. हद्दवाढीत दोन पोलीस ठाण्याचा सहभाग आहे.यामध्ये सगळे चौक,शहराकडे येणारे रस्ते,धार्मिक स्थळ,संवेदनशील भाग, सोन्याचे दागिने चोरण्याचे प्रकार होतात.त्या जागा लक्षात घेवुन विविध ठीकाणी कॅ मेरे बसविण्यात येणार आहेत. यामध्ये ३५ कॅ मेरे ‘मुव्हेबल’ आहेत. ते विविध अँगलमध्ये फिरुन चित्रीकरण करतील. या कॅ मेऱ्याचे ३० दिवसांचे रेकॉर्डिंग राहणार असुन ते सर्व ‘वायरलेस’ आहेत. यासाठी दोन टॉवर उभे केले जाणार आहेत.
…..