राज्यातील खेड्यापाड्यांतून, गावागावांतून विहार करणारी लालपरी आता ७१ वर्षांची झाली आहे. शनिवारी १ जून रोजी एसटीचा ७१ वा वर्धापन दिन आहे. राज्यातील सर्व विभागीय आणि जिल्हापातळीवरील एसटीच्या ५६८ बसस्थानकांवर हा वर्धापन दिन साजरा केला जाणार असल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.
राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरी म्हणजे एसटीने काळानुसार कात टाकली असून अनेक स्वागतार्ह बदलही केले आहेत. एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे यासाठी एसटीने पुढाकार घेत प्रवासात सवलती दिल्या आहेत, असेही मंत्री रावते यांनी सांगितले. एसटीने लालपरीपासून सुरू केलेला प्रवास हिरकणी, शिवनेरी, शिवशाही ते विठाई अशा सुखद टप्प्यावर आणला आहे. एसटीचा हा ७१ वा वर्धापन दिन राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवर उत्साहात साजरा करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यातील नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन आणि सत्कार संबंधित ठिकाणी करण्यात येणार असल्याचेही रावते यांनी सांगितले.