गेल्या कित्येक दिवसापासून उन्हाचे चटके सहन करणाऱ्या नागिरकांना आनंदाची बातमी आहे. येत्या चार दिवसात मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. म्हणजेच ६ किंवा ७ जूनपर्यंत केरळ किनारपट्टीवर पावसाला सुरुवात होईल. जवळपास ५ दिवस केरळ किनारपट्टीवर स्थिरावल्यानंतर येत्या १२ जूनपासून मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १८ मे रोजी अंदमान निकोबार बेटावर मान्सून दाखल झाला होता
अंदमान निकोबार बेटावर मान्सून स्थिरावल्यानंतर पावसाने केरळाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. त्यानुसार येत्या ६ जूनपर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होईल. दरम्यान मान्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातीला पावसाचा वेग कमी असू शकतो. मात्र १० जूननंतर पावसाचा जोर वाढायला सुरुवात होईल. दरवर्षीच्या तुलनेत यंदा केरळात मान्सून उशिराने दाखल होत आहे. दरम्यान पश्चिम किनाऱ्यावर मान्सूनच्या वारे दाखल होत आहेत. त्यामुळे केरळमध्ये पावसाचे आगमन झाल्यानंतर अवघ्या चार ते पाच दिवसातच महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.