वाशिम जिल्ह्यातील १३४ स्कूल बसेसचे परवाने रद्द !

स्कूल बस | 134 school buses licenses canceled in Washim district

सुरक्षित प्रवासासाठी जिल्ह्यातील स्कूल बसेसची फेरतपासणी करण्यासाठी निर्धारित मुदतीत आरटीओ कार्यालयात दाखल न झालेल्या स्कूल बसेसचा परवाना रद्द करण्याची कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील १४३ पैकी केवळ ९ स्कूल बस फेरतपासणीसाठी आल्या होत्या. त्यामुळे उर्वरित १३४ स्कूल बसेसचा परवाना २ महिन्यांसाठी रद्द केल्याच्या नोटीस संबंधित संस्थांना पाठविण्यात येत आहेत.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने ७ एप्रिल २०१६ रोजी दिलेल्या आदेशानुसार स्कुल बस म्हणून नोंदणी झालेल्या वाहनांना कार्यालयात फेरतपासणी करीता बोलावून त्या स्कुल बस नियमावली २०११ नुसार सुरक्षाविषयक तरतूदीचे काटेकारपणे पालन करतात किंवा कसे याबाबत तपासणी करणे आवश्यक असते. त्यासाठी स्कूल बस मालकांनी स्कूलबस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात किंवा शिबिरात प्रपत्र अ नुसार ३१ मे २०१९ पूर्वी हजर करुन स्कूल बसेसची फेर तपासणी करुन घ्यावी आणि तसा अहवाल प्राप्त करून घ्यावा, अशा सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिल्या होत्या. जिल्ह्यात १४३ स्कूल बसेस आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी स्कूल बसेसची तपासणी करण्याची मागणी पालकांनी केली होती. स्कूल बसची फेर तपासणी न केल्यास वाहनाचा परवाना निलंबन केला जाईल, असा इशाराही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिला होता. आता निर्धारित मुदतीत केवळ ९ स्कूल बस फेरतपासणीसाठी दाखल झाल्या असून, उफेरतपासणीसाठी न आणलेल्या १३४ स्कूलबसेसचा परवाना २ महिन्यांसाठी रद्द करण्यात आला असून, या संदर्भातील नोटीस संबंधित स्कूलबसचे मालक आणि संस्थांना पाठविण्यात येत आहेत. दरम्यान, यानंतरही फेर तपासणी न केलेले वाहन रस्त्यावर आढळल्यास जप्त करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here