Skip to content Skip to footer

परराज्यातील कामगारांची मेहनती वृत्ती; बारा तासही काम करण्याची असते तयारी

हाताला पडेल ते काम करण्याची असलेली तयारी, १२ तास काम करण्यासाठी नसलेली कुरकुर व कामातील प्रामाणिकता यामुळे चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये परप्रांतीय कामगारांच्या नियुक्तीचे प्रमाण वाढले आहे. सध्या ८ ते १० हजार परराज्यातील कामगार या एमआयडीसीमध्ये कार्यरत आहे. अखंडपणे महिनाभर हे बाहेरच्या राज्यातील कामगार कामावर येतात, असे चिंचोली औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या ३५ ते ४० हजार कामगार विविध कंपन्यांमध्ये काम करतात. यामध्ये पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश व बिहार या बाहेरच्या राज्यातील कामगारांची संख्याही दखल घेण्याजोगी आहे. सध्या बाहेरच्या राज्यातील कामगारांची संख्या ८ ते १० हजारांपर्यंत असेल असे सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी सांगितले. चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्या चालकांचा बाहेरच्या राज्यातील कामगाराबाबतचा अनुभव चांगला आहे. हाताला मिळेल ते काम आनंदाने करणे, स्थानिक कामगारांसोबत आठ तास काम केल्यानंतर वाढीव चार तास काम करण्यासाठी कसलीही कुरकुर नसणे, शिवाय कामातील प्रामाणिकपणाही बाहेरच्या राज्यातील कामगारांमध्ये दिसून येतो. म्हणूनच अनेक वर्षांपासून बाहेरच्या राज्यातील कामगार टिकून आहेत

अवघे १५ कामगार मिळाले: केशव रेड्डी
– सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष केशव रेड्डी वस्तुस्थितीचे एक उदाहरण सांगितले. औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीला ५० कामगारांची गरज होती. कंपनीला जवळपासच्या गावातून अवघे १५ कामगार मिळाले. कंपनीला उत्पादन सुरू करण्यासाठी पुरेसे कामगार नसल्याने कंपनीला परप्रांतीय कामगार शोधावे लागल्याचे अध्यक्ष रेड्डी यांनी सांगितले.

दोन महिने सुट्टीवर..
– मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यातील तरुण मुले ही वर्षातून दोनवेळा व दोन महिने सुट्टी घेऊन गावी जातात. १० महिने ते आठवड्याची सुट्टी वगळता नियमित कामावर येतात. काही कामगार तर सुट्टी दिवशीही कामावर येतात. त्यामुळे कंपन्यांना उत्पादनासाठी अडचण येत नाही. बाहेरच्या राज्यातील काही कामगार आता सहकुटुंबही येत असल्याने अशांची  राहण्याची सोय कंपनीच्या आवारातच केली जाते. त्यामुळे वेळेवर व निश्चित कामावर येतात.

Leave a comment

0.0/5