वाढत्या तापमानाचा परिणाम टाळण्यासाठी पुण्यातील एका डॉक्टरने चारचाकी गाडीला शेणाचा लेप देऊन थंडावा मिळवल्याचा दावा केला आहे. आश्चर्य म्हणजे हा लेप सुमारे महिनाभर टिकत असून त्याने गाडीचे किंवा गाडीच्या रंगाचे कोणतेही नुकसान होत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
याबाबत माहिती अशी की, डॉ नवनाथ दुधाळ यांनी महिंद्रा एक्सयूव्ही ५०० ही गाडी शेणाने लिंपली आहे. दुधाळ हे प्रसिद्ध टाटा कॅन्सर रुग्णालयात डॉक्टर आहेत. राज्यात सध्या वाढत्या उन्हाचा तडाखा कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. त्यामुळे होणारी अंगाची काहिली वाचवण्यासाठी वाळ्याचे पडदे, टोप्या, सनकोट असे पारंपरिक उपाय केले जातात. हल्ली थेट वरच्या मजल्यावरील उष्णता टाळण्यासाठी गच्चीला पांढऱ्या रंगाचा थरही दिला जातो. पण याही पुढे जात दुधाळ यांनी गाडीला शेणाच्या तीन थरांनी लिंपले आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातमधील एका महिलेनेही आपल्या गाडीला शेणाने सारवले होते. काचा, खिडक्या, लाईट वगळता बाकीच्या पत्र्याच्या भागाला शेण लावण्यात आले आहे. यातील एक थर वाळल्यावर त्यावर दुसरा थर लावण्यात येतो.
याविषयी दुधाळ म्हणतात की, ‘हा उपाय स्वस्त असून गाडीचा रंग किंवा पृष्ठभागावर कोणतेही परिणाम करत नाही. यामुळे आतील वातावरण सुमारे ७ ते ८ अंशांनी कमी होते. हल्ली तर मी एसी न वापरताही गाडीत बसू शकतो. पर्यावरणपूरक असलेल्या उपायात एकच अडचण म्हणजे शेण लावल्यावर काही तास त्याचा वास येतो मात्र गाडी पूर्ण वाळल्यावर हा वासही जातो.’
अजून तरी कोणत्याही तज्ज्ञाने या उपायावर भाष्य केले नसले तरी शेणाने सारवलेली जमीन अनेकदा थंड राहत असल्याचे दिसून आले आहे. त्यातच भारतात शेण सहज उपलब्ध होत असल्याने पुढील उन्हाळ्यात अशा गाड्या अधिक संख्येने दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.