पुणे : हवामान विभागाने केरळ येथे मॉन्सूनचे आगमन येत्या ६ जून रोजी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला होता़. त्यादृष्टीने अनुकुल वातावरण असले तरी केरळला मॉन्सून धडकण्यास आणखी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे़. येत्या २४ तासात मॉन्सून दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदिव कोमोरिन परिसर, मध्य बंगालचा उपसागरात दाखल होण्याच्या दृष्टीने अनुकुल हवामान आहे़. राज्यात मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे़. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान नागपूर येथे ४६़४ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १८़७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़.
सध्या केरळ, तामिळनाडु, कर्नाटकात अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडत आहे़. मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासात राज्यात सोलापूर ३०, उमरगा ४२, गंगाखेड २५, अहमदपूर, देवणी, पालन, उदगीर १६, औसा, जळकोट, लोहारा, परांडा, पूर्णा १०, बल्लापूर ३०, जोईती २०, चंद्रपूर कोरपना, राजूरा १० मिमी पावसाची नोंद झाली होती़.
विदर्भात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट कायम असून संपूर्ण मराठवाड्यात, कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे़. मध्य महाराष्ट्रात काही भागात किंचित वाढ झाली आहे़.
येत्या २४ तासात गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़. ६ व ७ जून रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. ८ जून रोजी संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़.
इशारा : ५ जून रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे़. विदर्भात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट तर तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे़. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे़.
६ ते ८ जून दरम्यान विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे़.