Skip to content Skip to footer

कोल्हापूरच्या आंबाबाई मंदिराची शिखरे सोन्याने मढणार……

साडेतीन शक्‍तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराची शिखरे सोन्याने मढविण्यात येणार आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. लोकसहभागातून मंदिराची पाचही शिखरे सोन्याने मढवली जाणार असून, लवकरच त्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. मंदिराला सुवर्णवैभव लाभणार असल्याने कोल्हापूरच्या वैभवात भर पडणार आहे. देशातील सुवर्ण मंदिर, अक्षरधाम, तिरुपती मंदिर, शिर्डीचे साई मंदिर आदी मंदिरांची शिखरे सोन्याने मढलेली आहेत. त्यापाठोपाठ करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराची पाचही शिखरे लवकरच सोन्याने मढणार आहेत. त्यासाठी गेली सहा महिने देवस्थान समितीचा अभ्यास सुरू आहे.

शिखर सोन्याने मढवण्याचा प्रथम प्रस्ताव मुंबई येथील सरकारी वकील अ‍ॅड. अविनाश खामखेडकर यांनी देवस्थान समितीपुढे ठेवला. देवीच्या मुख्य शिखराला सुवर्ण झळाळी देण्यासाठी एक किलो सोने देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. यानंतर देवस्थान समिती अध्यक्ष व पदाधिकार्‍यांनी याबाबत अभ्यास सुरू केला. त्यानुसार मंदिर शिखरांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पाचही शिखरांना सोन्याने मढवण्याची तयारी सुरू केली आहे. ही पाचही शिखरे सोन्याने मढवण्यासाठी साधारणत: २५ ते ३० किलो सोने लागेल, असा अंदाज कारागिरांकडून वर्तवण्यात आला आहे.

अंबाबाई मंदिराच्या शिखरांचे विनामोबदला स्ट्रक्चरल ऑडिट करून देण्याची तयारी एका कंपनीने दाखवली आहे. पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर असे दोन टप्?प्यात शिखरांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. याद्वारे मंदिर शिखरे किती ओझे पेलू शकतील, याचा अभ्यास होणार आहे. तांब्याचा, पितळेचा मुलामा शिखरे सहन करू शकतील का, याचा अभ्यास होणार आहे. तांब्या- पितळेच्या मुलाम्यावर सोन्याचा मुलामा देऊन शिखरांना सुवर्ण झळाळी देण्यासाठी किती सोने लागेल व त्यासाठी किती दिवस लागतील, हे निश्‍चित केले जाणार आहे.

Leave a comment

0.0/5