: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बाेर्डाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज लागणार असल्याची माहिती साेशल मिडीयावर व्हायरल हाेत आहे. या संदर्भातील अनेक मेसेज देखील साेशल मीडियावर पाठवले जात आहेत. परंतु या सगळ्या अफवा असल्याचे स्पष्टीकरण बाेर्डाकडून देण्यात आले आहे. तसेच अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील बाेर्डाकडून करण्यात आले आहे.
यंदा बारावीचा निकाला काहीसा आधी जाहीर झाला. 28 मे राेजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. बारावीचा निकाल लवकर जाहीर झाला असल्याने दहावीचा निकाल देखील लवकर जाहीर हाेईल असे बाेलले जात हाेते. काहींच्या म्हणण्यानुसार आज हा निकाल जाहीर हाेणार आहे. परंतु बाेर्डाकडून याला कुठलाही अधिकृत दुजाेरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या सर्व अफवाच असल्याचे समाेर आले आहे.गेल्या वर्षीचा दहावीचा निकाल 8 जून राेजी जाहीर करण्यात आला हाेता.
दरम्यान साेशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजबद्दल स्पष्टीकरण देताना बाेर्डाच्या अध्यक्षा शंकुतला काळे म्हणाल्या, आज 100 टक्के निकाल लागणार नाही. कोणी आज निकाल लागणार आहे असं सांगत असेल तर त्या केवळ अफवा आहेत असे समजावे. सध्या निकालाच्या कामाचा आढावा घेणे सुरू आहे योग्य वेळी प्रसिद्धी माध्यमांना कळविण्यात येईल.
यंदा मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर या नऊ विभागीय मंडळांतर्फे एक मार्च ते २२ मार्चदरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला राज्यभरातून १७ लाखांपेक्षा आधिक विद्यार्थी बसले होते.