पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चौपदरीकरण कामांची चांगलीच पोलखोल केली आहे. महामार्गालगत ठिकठिकाणी मातीचा भराव वाहून गेला आहे. तर अनेक ठिकाणी पर्यायी रस्ता खचला आहे. महामार्गालगतच्या घरांमध्येही पाणी गेले आहे. आज कणकवली शहर आणि वागदे परिसरात असलेल्या या रस्त्यामध्ये अनेक वाहने अडकली होती. बस स्थानक परिसरात रस्ता खचल्याने एसटी महामंडळाची बस देखील अडकून पडली होती.
पावसापूर्वी महामार्ग चौपदरीकरणअंतर्गत पाणी निचरा होण्याची सर्व कामे करावीत, असे निर्देश तसेच इशारे लोकप्रतिनिधींनी दिले होते. मात्र मुजोर हायवे ठेकेदारांनी यातील कोणतीही कामे केली नसल्याचा फटका वाहन चालक आणि सर्वसामान्यांना बसला आहे. सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व सरी कोसळल्या आहेत. सिंधुदुर्गातील काही भागात पावसाने गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास धूमधडाक्यात आपली हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणी प्रशासनाचा बोजवारा उडाला आहे.
7 जूनला केरळ येथे मान्सून दाखल होणार असल्याचे वृत्त वेधशाळेने वर्तवले होते. त्यामुळे येणाऱ्या पाच ते सहा दिवसांत हा पाऊस कोकणात येण्याची शक्यता होती. परंतु गुरुवारी सकाळीच मान्सूनपूर्व पावसाने मोठ्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह आपली हजेरी दर्शविली. तासभर पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
आकेरीत मुंबई-गोवा मार्गावर कोसळले झाड
सावंतवाडीसह अन्य भागात पावसाने गुरुवारी विजेच्या कडकडाटासह पहाटेच हजेरी लावली. वारा आणि पाऊस जोरदार सुरू झाल्याने मुंबई-गोवा मार्गावर आकेरी हेळ्याचे गाळू परिसरात मोठे झाड कोसळले. हे झाड जुने असल्याने ते कोसळल्याचे निदर्शनास येते आहे. झाड कोसळल्याने सावंतवाडीहून कुडाळकडे जाणारी वाहतूक व कुडाळहून सावंतवाडीकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. काही वाहने आता आकेरी तिठ्यावरुन झाराप-पत्रादेवी महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ होत कुडाळच्या दिशेने जात होती.