सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व सरी कोसळल्या आहेत. सिंधुदुर्गातील काही भागात पावसाने गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास धूमधडाक्यात आपली हजेरी लावली. यावेळी मोठमोठ्या गडगडाटासह जोरदार वादळी वारे वाहत होते, अशा परिस्थितीत तब्बल अर्धा तास पाऊस कोसळला. त्यामुळे परिसरात नुकसान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. गेले चार दिवस अंगाची मोठ्या प्रमाणात काहिली होत होती, त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
7 जूनला केरळ येथे मान्सून दाखल होणार असल्याचे वृत्त वेधशाळेने वर्तवले होते. त्यामुळे येणाऱ्या पाच ते सहा दिवसांत हा पाऊस कोकणात येण्याची शक्यता होती. परंतु गुरुवारी सकाळीच मान्सूनपूर्व पावसाने मोठ्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह आपली हजेरी दर्शविली. तासभर पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात संपुष्टात येण्याची शक्यता आहे.