Skip to content Skip to footer

महाराजांच्या जयघोषाने रायगड दुमदुमला……..

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने येथे गुरुवारी ३४५वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी गडपूजन आणि जागर शिवकालीन युद्धकलेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. कोल्हापूर हायर्कसच्या वतीने गडपूजन सोहळ्यासाठी राज्यातील अनेक गडकिल्ल्यांवरून तसेच लेह लडाख येथील स्टोट कांग्रीचे जल आणण्यात आले होते.

खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते गडपूजन झाले. त्यानंतर शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला. राज्यातील युद्धकला आखाड्यांचा यात सहभाग होता. तलवार, भाला, जांबिया, माडू, फरी- गदगा यांचे सादरीकरण झाले. या वेळी इतिहास अभ्यासक राम यादव यांच्या दुर्गराज रायगड परिचित-अपरिचित स्थळांचे छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

बुधवारी दिवसभर शिवभक्तांनी रायगडावर स्वच्छता मोहीम राबविली. बा रायगड परिवाराच्या वतीने ३१० शिवसैनिक, तर नामाचे मानकरी लाटवडे, ता. हातकणंगले या मोहिमेत सहभागी झाले. सोलापूरच्या विजय क्षीरसागर या चिमुकल्याने पोवाड्याचे गायन केले.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती यांच्यावतीने शिवराज्याभिषेक सोहळा, दुर्गराज रायगड येथे गुरुवारपासून सुरू झाला. यावेळी ‘जागर शिवकालीन युध्दकलेचा’ या मर्दानी खेळाचे सादरीकरण झाले. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी होळीच्या माळावर आपली युध्दकला या माध्यमातून सादर केली. या वेळी संभाजीराजेंसमवेत पोलंड व चीन येथील प्रतिनीधी उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5