पुणे : साहित्याच्या प्रचार, प्रसारासाठी आणि भाषेच्या संवर्धनासाठी गेल्या ११३ वर्षांपासून कार्यरत असलेली महाराष्ट्र साहित्य परिषद दिवसेंदिवस लोकाभिमुख होत आहे. गेल्या तीन वर्षात सुमारे २३०० साहित्यप्रेमींना आजीव सभासदत्व मिळाले आहे. संस्थात्मक शिस्त पाळली जावी, यासाठी सभासदत्वासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये तीन महिन्यांमध्ये आलेल्या अर्जांची छाननी करुन ते मंजूर केले जातात. गेल्या तीन वर्षात एकही अर्ज नाकारण्यात आलेला नाही. त्यामुळे परिषदेत नवोदित कवी, लेखक आणि वाचकांना स्थान दिले जात नसल्याच्या आरोप तथ्यहीन असल्याचे मसापकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेची स्थापना २७ मे १९०६ रोजी पुणे येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत साहित्यव्यवहार जिवंत ठेवण्याचे काम संस्थेने केले आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून साहित्याच्या प्रचार आणि प्रसाराला बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिषदेचे आजीव सदस्यत्व वर्षभरात केव्हाही स्वीकारता येऊ शकते. सध्या १६ हजारांहून अधिक साहित्यप्रेमी परिषदेचे आजीव सभासद आहेत, अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शहरांपुरता मर्यादित असलेला साहित्य व्यवहार ग्रामीण भागापर्यंत पोहोचावा, यासाठी मसापकडून विभागीय संमेलन, शाखा मेळावे, शिवार साहित्य संमेलन, बांधावरची संमेलने असे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. नवोदितांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले. परिषदेचे हे उपक्रम सर्वसमावेशकतेचे लक्षण असल्याची प्रतिक्रिया पदाधिका-यांकडून देण्यात आली.