Skip to content Skip to footer

नेत्रदानासाठी इच्छापत्र नव्हे तर इच्छाशक्ती महत्वाची

पुणे : जगातील अंधांच्या २० टक्के अंध भारतात आहेत. या अंधांना नवीन जीवन देणे हे आपले कर्तव्य आहे. नेत्रदानासाठी इच्छापत्राची गरज नसते. आपण नेत्रदान केल्यावर ज्यांना नेत्ररोपणाने दृष्टीलाभ होणार यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची आहे, असे नेत्रपेढीच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मृत्यूनंतर ताबडतोब आपले डोळे नेत्रपेढीस दान करणे म्हणजे नेत्रदान होय. मृत्यूच्या अगोदर नेत्रदान करता येत नाही. मृत्यूनंतर चार तासाच्या आत डोळे काढता येतात. नेत्रपेढीस कळवल्यास नेत्रपेढीचे कर्मचारी घरी येऊन डोळे घेऊन जातात.  नेत्रदानाची इच्छा असल्यास इच्छापत्र मृत्युपूर्वी नेत्रपेढीत भरून देता येते. त्यावर जवळचे नातेवाईक आणि फॅमिली डॉक्टरच्या सह्या असणे गरजेचे आहे. परंतु नेत्रदान इच्छापत्र भरले नाही. तरी मृत्यूनंतर नातेवाईकांच्या इच्छेनुसार डोळे काढून घेतले जाऊ शकतात. डोळे काढल्यावर पापण्या अशा रीतीने शिवल्या जातात की मृत व्यक्तीच्या चेहऱ्यास विद्रूपता येत नाही.
रेबीज, एड्स, व्हायरस, एनकेफेलायटीस, धनुर्वात, पसरलेला कर्करोग, सिफिलस, गॅस गँग्रीन, रक्तात पू येणे, कुष्ठरोग, विषबाधा, पाण्यात बुडून आलेला मृत्यू , काचबिंदू, डोळ्याचे पारदर्शक खराब असणे, असे काही ठराविक विकार असणाऱ्या व्यक्तींना नेत्रदान करता येत नाही. पण डोळ्याला चष्मा आणि मोतिबिंदू असणाऱ्या व्यक्तींना नेत्रदान करता येते.
नेत्रदान करण्यासाठी वयाचे बंधन नाही. एक वर्षापेक्षा जास्त वय असणारी व्यक्ती नेत्रदान करू शकते. परंतु नेत्रपेढीत पंधरा वर्षांवरील व्यक्तींचे डोळे घेतले जातात. डोळे काढून आणल्यावर नेत्रपेढीत डोळ्यांची तपासणी केली जाते. डोळ्यातील पारदर्शक पटल चांगले असल्यास ते नेत्ररोपणासाठी वापरले जाते. डोळे नेत्ररोपणास योग्य नसल्यास त्यांचा नेत्रसंशोधनासाठी उपयोग केला जातो.

नेत्रदानास कायद्याने घातलेली काही बंधने   
नेत्रदान ऐच्छिक असावे. मृत्यूअगोदर नेत्रदान करता येत नाही. मृत्यूचे प्रमाणपत्र असल्याशिवाय डोळे काढता येत नाहीत. कोणाचे डोळे कोणास बसवले यासंबंधी गुप्तता राखली जाते. नेत्रदान सुलभ व्हावे या दृष्टीने मृत्यूनंतर नेत्रदात्याच्या नातेवाईकांनी ही काळजी घ्यावी. मृत्यूनंतर ताबडतोब नेत्रपेढीस कळवावे. फोनवरून कळविताना घरचा पूर्ण पत्ता जवळच्या खुणेसहित द्यावा. मृत्यूचे कारण व केव्हा मृत्यू झाला हे कळवावे. मृत्यूचे प्रमाणपत्र असल्याशिवाय डोळे काढून घेतले जाऊ शकत नाहीत. मृत शरीराचे डोळे बंद करून त्यावर बर्फ किंवा थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. अँटीबायोटिक्स थेंब घालणे असल्यास डोळ्यात घालावेत. खोलीतील पंखा किंवा एअरकंडिशनर बंद करावा. डोक्याखाली उशी ठेवावी.

जगातील विविधतेने नटलेल्या सृष्टीची जाणीव करून देणारा अवयव नेत्र आहे. दृष्टी नसलेल्या लोकांना जग पाहता येत नाही. जन्मापासून डोळे नसतील तर आपण काहीच करू शकत नाही. पण जन्म झाल्यावर जागी काळाने विकारामुळे डोळे जाणे, अपघातात डोळे जाणे अशा व्यक्तींना नेत्ररोपण करता येते. नेत्ररोपण करता येते. नेत्रदान करण्यासाठी आपण बहुमोल मदत केली पाहिजे. जगात नेत्रदान हे एकमेव असे पुण्यकर्म आहे.
– डॉ. मिलिंद भोई, भोई प्रतिष्ठान

भारतात मोठ्या प्रमाणावर अंधांचे प्रमाण आहे. आपण नेत्रदान केल्याने अंध व्यक्तीला त्याचा फायदा होऊ शकतो. नेत्ररोपणाने दृष्टी येऊ शकते. आता नवीन रुग्ण वाढत आहेत. जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान करावे. समाजात विविध संस्था आणि नेत्रपेढी यासाठी जनजागृती करत आहेत.

Leave a comment

0.0/5