‘कार्नाड गेले म्हणजे फक्त एक रंगधर्मीच गेला असे नाही तर परंपरेच्या माध्यमातून आधुनिकतेच्या साह्याने समकालीन राजकीय, सामाजिक स्थितीवर भाष्य करणारा एका चिकित्सक, विवेकी, जाणत्या विचारवंतालाच आपण मुकलो’ अशीच भावना कार्नाड यांच्या सहवासात आलेल्या बहुसंख्य रंगकर्मींनी व्यक्त केली. पुण्यात सन १९७४- ७५ च्या दरम्यान फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष होण्याच्याही आधीपासून त्यांचा पुण्यातील नाट्यक्षेत्रात धडपडणाऱ्या अनेकांबरोबर संपर्क होता.
मोहन आगाशे ते अलिकडचे मोहित टाकळकर व्हाया समर नखाते, राजीव नाईक, प्रदीप वैद्य असा त्यांचा संवाद होता. साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान व विनोद दोषी फेस्टिवलचे संस्थापक सदस्य अशोक कुलकर्णी हे तर त्यांचे बेळगाव व नंतर मुंबईपासूनचे महाविद्यालयीन मित्र. ते पुण्यात स्थायिक झाल्यानंतर तर हा संवाद त्यांच्या माध्यमातून अधिकच वाढला. चित्रपट अभ्यासक समर नखाते हे त्यांचे एफटीआय मधील विद्यार्थी. ते म्हणाले, ‘‘माझी मुलाखतही त्यांनीच घेतली. त्यानंतर मी पदवी घेऊन बाहेर पडेपर्यंत तेच अध्यक्ष होते. पुराणकथांना आधुनिकतेचा साज देऊन ते वर्तमान स्थितीवर टोकदार असे भाष्य करत असत. त्यांच्यामुळे त्यावेळच्या अनेक मराठी रंगकर्मींना एका व्यापक संवेदनशीलतेबरोबर स्वत:ला जोडून घेता आले. त्यांनी त्यावेळी जे काही दिले ते कायमचे बरोबर राहिले.