Skip to content Skip to footer

यंदा ६ लाख ५० हजार रोपांची होणार लागवड !

महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने वन विभागाच्या पुढाकारातून यावर्षी वृक्ष लागवडीची मोहिम धडाक्यात राबविण्यात येणार आहे. यानुषंगाने चिखली तालुक्यासाठी यंदा ३ लाख वृक्षलागवडीचे उदिष्ट देण्यात आहे. मात्र, तालुक्यातील विविध विभागांकडून होणारी मागणी लक्षात घेता निर्धारित उद्दिष्ट्यापैकी अधिक रोपांची आवश्यकता दरवर्षी भासते. त्यानुसार वनविभागाने ६ लाख ५० हजार रोपे उपलब्ध करून दिली आहेत.

विविध सामाजिक, स्वयंसेवी व अशासकीय संस्थांचा देखील वृक्षारोपणात पुढाकार राहणार असल्याने तालुक्यात यंदा निर्धारित उद्दिष्ट्यापेक्षा दुप्पट रोपांच्या लागवडीचे शुभसंकेत आहेत. राज्य शासनाच्या वनविभागाच्यावतीने राज्यात दरवर्षी पावसाळ्यात वृक्षलागवडीची मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान वनमहोत्सव व पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येतो. यामध्ये प्रामुख्याने शासनाच्या पंचायत समिती, तहसील कार्यालय, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, नगर परिषद, सावर्जनिक बांधकाम विभाग, सिंचन विभाग आदी सर्वच विभागांवर त्यांच्या अखत्यारीत गावोगावी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

या कालावधीत वनीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे. दरम्यान,  यंदा चिखली तालुक्याला ३ लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट आहे. ही उद्दीष्ट्यपूर्ती होण्यासोबतच त्यात अधिकचे योगदान देवून विविध शासकीय कार्यालयांसह वनप्रेमी व सामाजिक संस्थांच्या मदतीने सुमारे ६ लाख ५० हजार वृक्षलागवडीचा चंग सामाजिक वनिकरण विभागाने बांधला आहे. त्यानुषंगाने वनक्षेत्रपाल विजय तळणीकर, तालुका लागवड अधिकारी, सहाय्यक लागवड अधिकारी यांनी सहकारी कर्मचाºयांसह कंबर कसली असून विविध कार्यालयांकडून वृक्ष रोपांची मागणी नोंदविण्यात येत आहे. पावसाळ्यात वृक्षारोपणासाठी यामध्ये सामाजिक वनिकरण विभागाच्या बोरगाव वसू येथील रोपवाटीकेत (नर्सरी) सध्या रोपे उपलब्ध असून सर्व रोपे लागवडीस योग्य आहेत.
शासनाने निर्धारित केलेल्या उद्दीष्ट्यापेक्षा अधिक रोपांची मागणी होत असल्याने वनविभागाने त्यानुषंगाने ६ लाख ५० हजार रोपांची निर्मिती केली आहे. वनमहोत्सवादरम्यान विविध शासकीय कार्यालयांबरोबरच अनेक स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था, पतसंस्था, शैक्षणिक संस्था, खाजगी मंडळे, संघटनांकडूनही या काळात वृक्षलागडीची मोहिम राबविण्यात येणार असल्याने ऐनवेळी रोपांची कमतरता भासू नये व सर्वांनाच मागणीनुसार रोपे उपलब्ध व्हावे, यासाठी तालुका लागवड अधिकारी कार्यालय प्रयत्नरत आहे. दरम्यान वनविभागाच्या नियोजनामुळे गेल्या चार वर्षांपासून तालुक्याला दिलेल्या उद्दीष्ट्यापेक्षा दरवर्षी दुपटीने वृक्षरोपांची लागवड होत असून यंदा ६ लाख ५० हजार वृक्षरोपांची लागवड होणार असल्याने तालुक्याच्या वनराईत मोलाची भर पडणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
रोपांची मागणी वाढणार
सामाजिक वनीकरण तसेच प्रादेशिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीकेतून रोपे मिळविण्यासाठी विविध विभागांनी तालुका लागवड अधिकारी कार्यालयाकडे मागणी नोंदविणे आवश्यक आहे. चिखली नगर पालिका, कृषी विभाग, पंचायत समिती, तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन विभाग, आदी विविध शासकीय कार्यालयांव्दारे दरवर्षी अधिक रोपांची मागणी होत आहे. याशिवाय विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, पतसंस्था, पोलीस प्रशासन, पशुवैद्यकीय विभाग, आरोग्य विभाग, तालुका पत्रकार संघ, डॉक्टर असोसिएशन, मेडीकल असोसिएशन, राजकीय पक्ष, मित्रमंडळे, गणेश मंडळे यांच्याकडूनही दरवर्षी रोपांची मोठी मागणी होत असते. ही बाब चिखली तालुक्याचे पर्यावरणप्रेम अधोरेखीत करते.
शेतकºयांनी बांधावर वृक्षारोपण करावे
तालुक्यात एकूण १४४ गावे तर १०१ ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतींच्या मोकळ्या जागांवर, गावातील प्रत्येक शाळा, आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांना वृक्ष लागवडीचे उदिष्ट दरवर्षी ठरवून देण्यात येते. याशिवाय विविध सहकारी संस्था, पतसंस्था, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, खुली जागा, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण केल्या जाते. दरम्यान, तालुक्यातील शेतकºयांनी या राष्टÑीय उपक्रमात योगदान देण्यासाठी आपल्या शेताच्या बांधावर वृक्षारोपण करून वृृक्षलागवडीत भर घालावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
विविध जातीच्या वृक्षरोपांनी बहरली वाटीका 
चिखली तालुक्यात सामाजिक वनिकरण विभागाचे बोरगाव वसु येथे तर प्रादेशिक वनिकरण विभागाचे अंचरवाडी व असोला नाईक येथे दोन असे एकूण तीन रोपवाटीका आहेत. या वाटीकेत कडूनिंब, पिंपळ, वड, रेन ट्री, काशीद, शिरस, उंबर, आवळा, कारनेट, चिंच, सिताफळ, जांभुळ, शिसु, शिसम, आंबा, पेल्टोफॉम आदी विविध जातींच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यात मोलाची मदत करणारे लागवडी योग्य वृक्षरोपे उपलब्ध असून याची संख्या ६ लाख ५० हजारच्यावर आहे.

Leave a comment

0.0/5