बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती मिळण्यास विलंब

इयत्ता बारावी | Delayed students get the photocopy of the answer sheet for HSC students

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागून दहा दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला. मात्र,अद्याप अनेक विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती मिळालेल्या नाहीत.पुणे विभागीय मंडळाला वेळेत शिक्षक उपलब्ध न झाल्याने हा विलंब होत असल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.परंतु,छायांकित प्रती वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी राज्य मंडळाच्या अधिकांकडे तक्रार केली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र,भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,गणित,जीवशास्त्र आदी विषयात विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले.त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने छायांकित प्रती मिळण्यासाठी अर्ज केला.

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी छायांकित प्रती मिळाव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे यांच्यासह पुणे विभागीय मंडळाचे सचिव बबन दहिफळे यांची भेट घेतली. मात्र, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 29 मे रोजी छायांकित प्रतिसाठी अर्ज करूनही अद्याप अनेक विद्यार्थ्यांना अर्ज मिळाले नाहीत.बुधवारी दुपारी पुन्हा काही विद्यार्थ्यांनी शकुंतला काळे यांच्या भेट घेवून छायाकिंत प्रती लवकर देण्याची मागणी केली

नचिकेत वाघमारे,दिव्या भारती,वैष्णवी रेवसकर आदी विद्यार्थ्यांनी काळे यांची भेट घेतली.तसेच पुणे विभागीय मंडळाकडून छायांकित प्रती मिळण्यास विलंब होत आहे.त्यामुळे पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत अडचणी येत आहेत.त्यामुळे छायांकित प्रती लवकर उपलब्ध करून द्याव्यात,अशी मागणी केली.

राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना छायांकित प्रती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यानुसार विभागीय मंडळांकडून लवकरात लवकर छायांकित प्रती देण्याबाबत आवश्यक कार्यवाही केली जात आहे.- डॉ.शकुंतला काळे,अध्यक्षा,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती देण्यापूर्वी संबंधित उत्तरपत्रिका शिक्षकांकडून तपासून घेतल्या जातात.मात्र,पुणे विभागीय शिक्षण मंडळाकडे वेळेत आवश्यक शिक्षक उपलब्ध होऊ शकले नाहीत.परतु,आता शिक्षक उपलब्ध झाले आहेत.त्यामुळे ६ जुलैपर्यंत अर्ज केलेल्या ८० ते ९० टक्के विद्यार्थ्यांना येत्या गुरूवारपर्यंत उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती मिळतील.विभागीय मंडळाकडे एकूण ५ हजार ६७८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून त्यातील ६९८ विद्यार्थ्यांच्या छायांकित प्रती तयार आहेत.त्यातील ४०८ विद्यार्थ्यांना छायांकित प्रती दिल्या असून १८२ विद्यार्थी प्रती घेवून गेले नाहीत.परंतु,गुरूवारी २ हजार ८०० ते ३ हजार विद्यार्थ्यांच्या छायांकित प्रती तयार होतील. – बबन दहिफळे,सचिव,पुणे विभागीय मंडळ

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here